हवाई, 24 डिसेंबर : जगभरातील अनेक धर्मांमध्ये स्वर्ग, नरक अशा संकल्पना पाहायला मिळतात. स्वर्गात सुख, आनंद असल्याचे मानलं जाते तर नरकात दुःख याताना असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रत्येकालाच स्वर्गात जाण्याची इच्छा असते. आता स्वर्ग, नरक या गोष्टी आहेत, की नाही हा वादाचा मुद्दा आहे. त्याकडे आपल्याला जायचं नाही. स्वर्गात जाणाऱ्या शिडीचा उल्लेख तुम्ही अनेकदा ऐकला किंवा वाचला असेल. पण, अशी शिडी खरच अस्तित्वात आहे का? अमेरिकेतील हवाई राज्यात, हायकू व्हॅलीमध्ये एक ठिकाण असं आहे, जे सर्व बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे. येथे 4 हजार पायऱ्यांची एक शिडी असून ती स्वर्गात जाण्याचा मार्ग या नावाने प्रसिद्ध आहे. दरवर्षी शेकडो लोक या शिडीवर चढण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात.
हायकू व्हॅलीतील प्रसिद्ध शिडी
अमेरिकेचा स्वर्गात जाणारी ही शिडी 2500 फुटांपेक्षा जास्त उंचीवर नेते. ही देशातील सर्वात सुंदर (आणि सर्वात भयानक) चढाई आहे. फ्रेंड्स ऑफ हायकू स्टेअर्सच्या म्हणण्यानुसार ही शिडी 18 इंच रुंद आणि एकूण 4000 फूट लांब आहे. सरासरी उतार सुमारे 30 अंश आहे आणि पायवाट इतकी उंच आहे की गिर्यारोहणात असे बिंदू आहेत जिथे शिखरे ढगांच्या वर येतात. हा जिना केही-ए-कहोई नावाच्या उंच जागेवर जातो. वास्तविक या शिडीवर चढणे बेकायदेशीर असले तरी शेकडो लोक या पायऱ्या चढण्यासाठी येतात. हे ठिकाण अतिशय आकर्षक असल्याने सुरक्षा रक्षकांना टाळण्यासाठी लोक पहाटेच पोहोचतात. येथे लोकांना सुंदर पर्वतांचे दृश्य पहायचे असते. अनेक पर्यटकांनी येथे भेट दिल्यानंतर सांगितले की ते हे ठिकाण कधीही विसरणार नाहीत.
कमजोर हृदय असल्यांचं काम नाही
सध्यातरी ही शिडी चढण्यावर कायदेशीर बंदी आहे. परिणामी साहसी लोकांना पहाटेच इथं चढाईला यावं लागतं. त्यामुळे ही शिडी चढणे अजून धोकादायक होते. सकाळी धुके असल्याने पायऱ्यांवर ओलावा निर्माण होतो. सोबतच दृष्यमानही कमी होते. त्यामुळे प्रत्येक पाऊल मोजूनमापूनचं टाकावं लागतं. एक चुकीचं पाऊल तुमचा जीव घेऊ शकतं. हे ठिकाणी खूप उंचीवर असल्याने काळजीपूर्वक चढाई करावी लागते. त्यामुळे ज्यांना उंचीची भिती वाटते किंवा कमजोर काळीज असलेल्या लोकांचं हे काम नाही, असं म्हटलं जातं.
ऑगस्ट 2012 मध्ये, डॉन टिकी शो गायक आणि कॉमेडियन फ्रिट्झ हसेनपुश यांचे हायकू पायऱ्या चढत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तर 2014 मध्ये सहा जणांना अटक करण्यात आली होती. सिटी प्रॉसिक्युटर्स ऑफिसने म्हटले आहे की दुसऱ्या डिग्रीमध्ये गुन्हेगारी अतिक्रमणासाठी 1000 डॉलर दंड आकारला जातो. मागील अनेक वर्षांमध्ये असंख्य लोकं या पायऱ्या चढताना जखमा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
स्वर्गात जाण्यासाठी जिना कधी आणि कसा बांधला गेला?
वास्तविक हे 1942 मध्ये अमेरिकन सैन्याने अँटेना उभारण्यासाठी तयार केले होते जेणेकरून रेडिओ कम्यूनिकेशन करता येईल. नंतर हा अँटेना अमेरिकेच्या तटरक्षक दलाने ताब्यात घेतला. आताही येथे 2 लाख वॅटचा रेडिओ अँटेना पाहायला मिळतो, ज्यामुळे दूरवर संपर्क साधता येतो. हा जिना काँक्रीटचा आहे, पूर्वी तो लाकडाचा होता. आता लोक सरकारकडे या पायऱ्यांवर चढण्यासाठी कायदेशीर करण्याची मागणी करत आहेत. मात्र, सरकारचे म्हणणे आहे की पायऱ्यांच्या देखभालीसाठी खूप खर्च येईल आणि त्याचा आर्थिक फायदा होणार नाही.
ही शिडी काढण्याचा सरकारचा निर्णय
अमेरिकेतील हवाई राज्य नेत्रदीपक समुद्रकिनारे आणि प्रतिष्ठित हायकू पायऱ्या किंवा स्वर्गात जाणाऱ्या शिडीसाठी देखील प्रसिद्ध आहे. मात्र, या ठिकाणी होणारी असंख्य बेकायदेशीर अतिक्रमण आणि पायऱ्या चढताना जखमी होणाऱ्या लोकांची वाढती संख्या पाहाता हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Travelling