Explainer: हिंदी महासागराचं Genome mapping का केलं जातंय?

Explainer: हिंदी महासागराचं Genome mapping का केलं जातंय?

Genome Mapping Indian Ocean: समुद्राचं जीनोम मॅपिंग पहिल्यांदाच गोव्यात सुरू झालं आहे. काय आणि कशासाठी आहे हा प्रकल्प?

  • Share this:

पणजी, 15मार्च: समुद्राचा हवामानातील(sea weather) बदलाला(changes) मिळणारा प्रतिसाद, पोषक गोष्टींवर वाढणारा तणाव (stress)आणि वाढतं प्रदूषण(pollustion) तसंच सागरातील जैव रसायनशास्त्र (biochemistry)याबाबत सखोल संशोधन (research)करण्यासाठी देशातील पहिला संशोधन प्रकल्प पणजी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्यावतीनं हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी हिंदी महासागरात जीनोम मॅपिंग करण्यात येणार आहे.

देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच संशोधन प्रकल्प असून, यासाठी पणजी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या (NIO) 30 वैज्ञानिक आणि संशोधकांचे पथक आणि 30 कर्मचारी सिंधू साधनावरील जहाजाच्या (Sindhu Sadhana Research Vessle) साहाय्यानं पुढील तीन महिने हिंद महासागरात दहा हजार नाविक मैलांच्या मार्गावर प्रवास करून संशोधन करणार आहेत, अशी माहिती एनआयओचे संचालक सुनील कुमार सिंह यांनी दिली.

समुद्रातील जैव रसायनशास्त्र (Bio Chemistry) आणि समुद्राचा हवामान बदल (Climate Change), पोषक गोष्टींवरील तणाव (Nutrient stress) आणि वाढतं प्रदूषण याला मिळणारा प्रतिसाद समजून घेतला जाणार आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संकल्पित, असलेला हा प्रकल्प यंदा हाती घेण्यात आला असून, या कामात तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दी इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचे वृत्त दिलं आहे.

या प्रकल्पासाठी संशोधकांची तुकडी भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून प्रवास करत ऑस्ट्रेलिया, मॉरीशसमधील पोर्ट लुईस आणि पाकीस्तानाच्या सीमेपर्यंत जाणार आहे. या प्रवासादरम्यान जीनोम मॅपिंगसाठी (Genome Mapping) ते सरासरी 5 किलोमीटर खोलीवरील मायक्रोऑरगनिझम्सचे (Micro Organisms) नमुने गोळा करणार आहेत. ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरातील जीन्स (Genes) संशोधनासाठी रक्ताचे नमुने घेतले जातात त्याप्रमाणे या नमुन्यांच्या आधारे डीएनए (DNA) आणि आरएनए (RNA) मॅपिंग केलं जाणार आहे.

या संशोधनासाठी महासागरात खोलवर असलेले विविध मायक्रोऑरगनिझम्सचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. याकरता 24 टेफ्लॉन कोटेड बाटल्यांचा वापर केला जाणार असून, 8 किलोमीटर लांबीच्या केव्ह्लार केबलच्या मदतीनं हे नमुने जमा केले जाणार आहेत, तर जिवाणूंचे नमुने लिक्विड नायट्रोजनच्या सहायानं उणे 60 डिग्री सेल्सिअस तापमानात साठवले जाणार आहेत. या संशोधन जहाजावर असलेल्या सहा प्रयोगशाळांमध्ये या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे, तर आगामी तीन वर्षांच्या कालावधीत अनेक नमुने एनआयओमध्ये संशोधनासाठी आणले जाणार आहेत.

(हे वाचा: Explainer : भारत-चीन सीमावादामुळे हवामान बदलाच्या संशोधनावर होतोय परिणाम

महासागरातील सूक्ष्मजीवांमधील अर्थात मायक्रोऑरगनिझम्समधील आरएनए आणि डीएनएमधील बदल कोणत्या घटकांमुळं होतात यावर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. पाण्यातील खनिजांची कमतरता (Minerals) किंवा अधिक प्रमाण याला मायक्रोऑरगनिझम्स कसा प्रतिसाद देतात, वातावरणातील बदल आणि अन्न चक्रातील बदल यांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो यावर संशोधन केलं जाणार आहे. या सगळ्या संशोधनाचा व्यापक स्तरावर उपयोग होऊ शकतो. कर्करोगावरील उपचारांसह व्यावसायिक एन्जायम्स आणि विषाणू प्रतिबंधक रेणू अशा जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील वैविध्यपूर्ण घटकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे हा संशोधन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

हा प्रकल्प अनेक क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरणार असून, या संशोधनामुळं भारतातील सागरी संशोधन क्षेत्राला चालना मिळणार आहे. सागरी संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याची संधी भारताला मिळाली आहे.

First published: March 15, 2021, 10:39 PM IST

ताज्या बातम्या