रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय? जाणून घ्या रंजक माहिती

रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय? जाणून घ्या रंजक माहिती

रस्त्याच्या कडेला असणारे माइलस्टोन्स (Milestones) अर्थात मैलाचे दगड आपण नेहमी पाहात असतो. यांचा रंग वेगवेगळा का असतो याचा कधी विचार केला आहे का?

  • Share this:

नवी दिल्ली 17 एप्रिल : रस्त्याच्या कडेला असणारे माइलस्टोन्स (Milestones) अर्थात मैलाचे दगड आपण नेहमी पाहात असतो. नेहमीचा, कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास (Travel) असो किंवा लांबचा प्रवास असो, आपल्या गंतव्य स्थानी जाण्याचं किती अंतर कापायचं अजून बाकी आहे, याची खूणगाठ या दगडांमुळे आपल्या मनाशी बांधता येते. हे दगड सगळीकडेच असल्यामुळे त्यात कोणाला काही नवल वाटायचं कारण नाही. पण एका गोष्टीचं आश्चर्य मात्र तुम्हाला कधीतरी वाटलेलं असू शकतं किंवा त्याबद्दल कधीतरी तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असू शकतो. तो म्हणजे हे दगड वेगवेगळ्या रंगाचे का असतात? त्या रंगांचा अर्थ नेमका काय होतो?

मैलाच्या दगडांवरच्या त्या रंगांचा अर्थ आपण इथे पाहणार आहोत; पण आधी मैलाचे दगड म्हणजे नेमकं काय, हे जाणून घेऊया. जिल्ह्यांतर्गत मार्ग, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग अशा सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवर महत्त्वाच्या ठिकाणांचं अंतर दाखवणारे जे दगड रस्त्याच्या कडेला असतात, त्यांना मैलाचे दगड म्हणतात. आपल्या देशात 58.98 लाख किलोमीटर लांबीचं रस्त्यांचं जाळं आहे. त्यात ग्रामीण मार्गांपासून राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस वेजचा (Express Ways) समावेश आहे.

नारिंगी रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन (Orange Strips)

नारिंगी रंगाची अर्थात ऑरेंज स्ट्रिप असलेले माइलस्टोन ग्रामीण भागातल्या रस्त्यांवर (Rural Roads) असतात. ग्रामीण भागातले रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि जवाहर रोजगार योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांच्या माध्यमांतून बांधण्यात आलेले आहेत. 3.93 लाख किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते आपल्या देशात आहेत.

पिवळ्या रंगाची पट्टी असलेले माइलस्टोन (Yellow Strips)

तुम्हाला प्रवास करत असताना पिवळ्या रंगाची अर्थात येलो स्ट्रिप असलेले माइलस्टोन दिसत असतील, तर याचा अर्थ असा, की तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून (National Highways) प्रवास करत आहात. हे रस्ते देशातली विविध शहरं आणि राज्यांना जोडणारे असतात. 2021च्या आकडेवारीनुसार देशात एक लाख 51 हजार 19 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.

काळी किंवा निळी पट्टी असलेले माइलस्टोन (Black or Blue & White Strips)

काळी किंवा निळी आणि पांढरी पट्टी असलेले माइलस्टोन तुम्हाला प्रवासादरम्यान दिसत असतील, तर त्याचा अर्थ असा, की तुम्ही शहरातल्या किंवा जिल्हा मार्गावरून (District Road) प्रवास करत आहात. देशात सध्या पाच लाख 61 हजार 940 किलोमीटर्स लांबीचे जिल्हा मार्ग आहेत.

हिरवी पट्टी असलेले माइलस्टोन (Green Milestones)

हिरव्या रंगाची पट्टी अससलेले माइलस्टोन राज्य महामार्गावर असतात. राज्यमहामार्ग (State Highways) हे एकाच राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांना जोडतात. 2016 मधल्या आकडेवारीनुसार देशात एक लाख 76 हजार 166 किलोमीटर्स लांबीचे राज्यमहामार्ग आहेत.

झीरो माइल सेंटर (Zero Mile Centre)

ब्रिटिशांच्या कालावधीत नागपूर (Nagpur) शहराला झीरो माइल सेंटर म्हणून गृहित धरण्यात आलं होतं. देशातल्या अन्य सर्व महत्त्वाच्या शहरांचं अंतर मोजण्यासाठी नागपूर हा संदर्भ बिंदू (Reference Point) म्हणून गृहित धरण्यात आला होता.

Published by: Kiran Pharate
First published: April 17, 2021, 4:21 PM IST

ताज्या बातम्या