मुंबई, 04 जून : देशात पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona Virus Second Wave) एकच हाहाकार माजवला. या लाटेत विषाणूच्या संसर्गाचा वेग अधिक असल्यानं देशभरात संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसाला तीन लाखांवर गेली होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त होतं. त्यामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यानं तर हे संकट अधिकच तीव्र केलं, अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी बळी गेला. देशात आतापर्यंत 3 लाख 40 हजारपेक्षा जास्तजणांचा या आजारानं (Corona death in india) मृत्यू झाला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी संकट अजूनही कायम आहे.
देशभरात कोरोना विषाणू संसर्गाची लाट पसरल्यापासून रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण महाराष्ट्रात (Maharashtra Corona death) अधिक राहिलं आहे. त्यात दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटकाही महाराष्ट्राला बसला. महाराष्ट्राची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढली. त्यामुळे महाराष्ट्र देशभरात कोविड-19चे सर्वाधिक रुग्ण असणारे राज्य ठरलं. आतापर्यंत राज्यात 58 लाखांहून अधिक जणांना या रोगाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रानं गुरुवारी मृतांच्या आकडेवारीचा एक लाखांचा टप्पा (Crossed One Lakh Deaths) पार केला आहे. गुरुवारी राज्यात एका दिवसात 654 मृत्यूंची नोंद झाली तर एकूण मृतांचा आकडा 1 लाख 233 वर पोहोचला. गुरुवारी नोंदवण्यात आलेल्या मृत्यूमध्ये 307 मृत्यू गेल्या आठवड्यातील होते.
हे वाचा - राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट, 289 बाधित रुग्णांचा मृत्यू
देशातील मृत्यूचा विचार करता महाराष्ट्रात कोविड-19 रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक होते. तर दुसऱ्या लाटेत सर्व प्रकारच्या आजारानं झालेल्या मृत्यूंमध्ये ते 30 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यातील जवळपास निम्मे मृत्यू 15 फेब्रुवारीनंतर म्हणजे दुसरी लाट पसरल्यानंतर झाले आहेत, असंच आकडेवारीवरून दिसून येतं.
राज्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) या रोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव राहिला आहे. सर्वाधिक मृत्यूही याच शहरात झाले आहेत. मुंबईत मृतांचा आकडा 15हजारांच्या जवळपास आहे तर पुण्यात 12 हजार 700 पेक्षा जास्त मृत्यू आहेत. ठाण्यात 8 हजारपेक्षा जास्त तर नागपूरमध्ये 6500 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.
हे वाचा - खळबळजनक! कोरोना आता घेतोय प्राण्यांचाही जीव; कोविड पॉझिटिव्ह सिंहाचा मृत्यू
महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सर्वाधिक मृत्यू नोंदले गेले आहेत. अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यू यांचे प्रमाण व्यस्त आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या दोन टक्के रुग्ण पंजाबमध्ये आहेत तर तिथं मृत्यूचं प्रमाण 4.5 टक्के आहे. आतापर्यंत तिथं 15 हजार मृत्यू झाले आहेत. रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण तिथं 2.58 टक्के आहे. दोन टक्क्यांवर हे प्रमाण असणारे हे एकमेव राज्य आहे. देशाचे सरासरी प्रमाण 1.31 टक्के आहे तर महाराष्ट्रात हे प्रमाण 1.73 टक्के आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Death, Maharashtra