Home /News /explainer /

Explainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून? वाचून ज्ञानात पडेल भर

Explainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून? वाचून ज्ञानात पडेल भर

ही पदकं कशापासून बनलेली असतात, सुवर्णपदक खरंच सोन्याचं असतं का, असे प्रश्न अनेकांना पडत असतात.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकदा पुढे ढकलल्या गेलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा (Olympic Games) यंदाही होताहेत की नाही, असं वातावरण होतं; मात्र जपानने (Japan) अनेक अडचणींवर मात करून अखेर स्पर्धा भरवलीच. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने (Mirabai Chanu) वेटलिफ्टिंग (Weightlifting) क्रीडाप्रकारात रौप्यपदक (Silver Medal) जिंकून भारताची पताका फडकवली. आपल्या देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणं आणि देशासाठी पदक जिंकून देशाची मान उंचावणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. त्यामुळे पदक प्रत्येक खेळाडूसाठी अमूल्य असतं; पण ही पदकं कशापासून बनलेली असतात, सुवर्णपदक खरंच सोन्याचं असतं का, असे प्रश्न अनेकांना पडत असतात. अशा काही प्रश्नांची उत्तरं येथे देत आहोत. 'दैनिक भास्कर'ने याबद्दलची विस्तृत माहिती प्रसिद्ध केली आहे. सध्याची सुवर्णपदकं (Gold Medal) पूर्णतः सोन्याची नसतात. पूर्णतः सोन्यापासून बनविलेली सुवर्णपदकं 1912 साली स्टॉकहोममध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेपर्यंत देण्यात येत होती. त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) नियमांच्या आधारे सुवर्णपदकांची निर्मिती केली जाते. त्यामुळे सध्याची सुवर्णपदकं चांदीपासून तयार केली जातात आणि त्यावर सोन्याचं फक्त पॉलिश केलेलं असतं. जपान (Japan) हा तांत्रिकदृष्ट्या प्रगत देश आहे. त्याची झलक पदकांच्या निर्मितीतही दिसली आहे. जुन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा पुनर्वापर करून त्यापासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पदकं तयार करण्यात आली आहेत. ही जुनी उपकरणं सर्वसामान्य जपानी नागरिकांनी दान दिली आहेत. त्यामुळे सर्वांचंच त्यात प्रतिनिधित्व आहे. मेडलचं डिझाइन निश्चित करण्यासाठी जपानने (Tokyo Olympics 2020) एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यात 400 जणांनी सहभाग घेतला होता. त्यातून जुनिची कावानिशी यांच्या डिझाइनची निवड करण्यात आली. खेळाडूंची ऊर्जा आणि बुद्धिमत्ता प्रतिबिंबित होते, अशा प्रकारचं हे डिझाइन आहे. पदकाच्या दुसऱ्या बाजूला टोकियो ऑलिम्पिकचं नाव, लोगो आणि विजयाची ग्रीक देवता नाइकीची प्रतिमा आहे. या पदकांच्या रिबन्सही पुनर्वापर केलेल्या पॉलिस्टर फायबर्सपासून तयार करण्यात आल्या आहेत. त्याचं डिझाइन पारंपरिक जपानी पद्धतीचं दर्शन घडवतं आणि विविधतेतून एकतेचा संदेश देतं. रिबनच्या पृष्ठभागावर सिलिकॉन कॉन्व्हेक्स लाइन दिली असल्यामुळे केवळ रिबनला (Ribbon) स्पर्श करूनही ते सुवर्णपदक आहे की अन्य कोणतं, हे सांगता येतं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निकषांनुसार सुवर्ण, रौप्य आणि कास्य (Bronze Medal) अशा तिन्ही पदकांची जाडी 7.7 मिलिमीटर ते 12.1 मिलिमीटर असली पाहिजे, तर व्यास 85 मिलिमीटर असला पाहिजे. सुवर्णपदकात कमीत कमी सहा ग्रॅम सोनं असलं पाहिजे, असं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे नियम सांगतात. तसंच, पदकाच्या एका बाजूला विजयाची ग्रीक देवता नाइकीची प्रतिमा, 1896 साली पहिली ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्या पनाथिनाइकोस स्टेडियमची प्रतिमा असते. पदकाच्या दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिक स्पर्धेचा पाच रिंग्जचा ऑफिशियल लोगो आणि नाव असतं. सुवर्णपदकाचं वजन 556 ग्रॅम असून त्यापैकी 6 ग्रॅम सोनं, तर 550 ग्रॅम चांदी आहे. रौप्यपदक शुद्ध चांदीचं असून, त्याचं वजन 550 ग्रॅम आहे. कांस्यपदकाचं वजन 450 ग्रॅम असून, त्यात 428 ग्रॅम तांबं, तर 22 ग्रॅम झिंक हा धातू असतो. आपल्याला माहिती असेलच, की पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला सुवर्णपदक, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला रौप्यपदक आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला कांस्यपदक दिलं जातं. पूर्वीच्या काळी हे सुवर्णपदक पूर्णपणे शुद्ध सोन्याचा वापर करून तयार केलं जात होतं. सोनं हे इतर धातूंच्या तुलनेत अधिक नरम आणि लवचिक असतं. त्यामुळे जेव्हा पहिल्या क्रमांकाचे विजेते आपलं सोन्याचं पदक चावायचे, तेव्हा त्यांच्या दातांचे व्रण त्या पदकावर उमटत. आपल्या पदकावर आपली छाप उमटवण्याचा हा एक प्रकार होता. शिवाय असं केल्यामुळे आपल्याला मिळालेलं पदक खरंच सोन्याचं असल्याची खात्रीही त्यांना करता येत होती. पूर्वी पदक चावण्यामागे काही कारण असलं, तरी आता मात्र केवळ छायाचित्रासाठी पोझ म्हणून खेळाडू तसं करतात. कारण सुवर्णपदकात सोनं फारच कमी असतं.
    First published:

    Tags: Gold medalist, Olympics 2021, Tokyo

    पुढील बातम्या