मराठी बातम्या /बातम्या /explainer /कोरोनापासून लहान मुलांना वाचवण्यासाठी धडपड; काय आहे सरकारचा प्लॅन?

कोरोनापासून लहान मुलांना वाचवण्यासाठी धडपड; काय आहे सरकारचा प्लॅन?

लहान मुलांसाठी आता आणखी एक धोक्याची घंटा वाजलेली आहे.

लहान मुलांसाठी आता आणखी एक धोक्याची घंटा वाजलेली आहे.

लहान मुलांमधील कोरोनाची प्रकरणं समोर आल्यानंतर आता सरकारने तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबई, 22 मे : कोरोना संसर्गाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे देशभरातल्या आरोग्य यंत्रणेची वाट लागली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञ तिसऱ्या लाटेसाठीही (Third Wave )तयार राहण्याचा इशारा देत आहेत. ही लाट या वर्षाच्या अखेरीला येणं अपेक्षित असून, त्यात लहान मुलांना (Coronavirus in kids) अधिक धोका असल्याचं म्हटलं जात आहे.

20 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 10 राज्यांतल्या जिल्ह्याधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या तरुण आणि मुलांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण किती आहे, याची माहिती गोळा करण्यास सांगितलं. या माहितीचं वेळोवेळी विश्लेषण करणं त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूच्या B.1.617 या स्ट्रेनमुळे भारतात दुसरी लाट पसरली आणि पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या मुलांचं प्रमाण अधिक होतं. या लाटेत अगदी नवजात बालकांनाही कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत असलेल्या कोविड रुग्णांपैकी 60 टक्के रुग्णांना B.1.617 या स्ट्रेनचा संसर्ग झाला होता. या स्ट्रेनमध्येही B.1.617.1; B.1.617.2; B.1.617.3 असे तीन उपप्रकार आढळले आहेत.

मुलांना धोका का? आणि लसीकरण का अत्यावश्यक?

अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे, की तिसऱ्या लाटेचा प्रभाव मुलांवर जास्त पडण्याची शक्यता आहे. सिंगापूरमध्ये (Singapore) तसं झाल्याचं त्या देशाने जाहीर केलं आहे.

विषाणूतज्ज्ञ डॉ. व्ही. रवी यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितलं, 'प्रतिकारशक्ती चांगली नसलेल्यांना विषाणू लक्ष्य करणार हे उघड आहे. या विषाणूचा संसर्ग तुम्हाला झाला तर किंवा तुम्ही लस घेतली तर तुमच्यामध्ये त्याला प्रतिकार करण्याची शक्ती तयार होईल. मोठ्यांसाठी लशी तयार झाल्याने ते आता लसीकरण करून घेत आहेत. पहिल्या लाटेत संसर्ग झालेल्यांमध्ये केवळ चार टक्के मुलांचा समावेश होता. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांवर गेलं आहे.' भारतात मुलांसाठी अद्याप लस नसल्यामुळे किमान 60टक्के मुलांना धोका आहे, असं ते म्हणतात.

डॉ.बकुल जे. पारेख आणि डॉ. समीर दलवाई यांनी न्यूज 18 मध्ये लिहिलेल्या लेखात हा मुद्दा मांडला होता. 'दुसऱ्या लाटेत संसर्गाची क्षमता जास्त असल्याने मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसलं. तसंच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक दिसलं. हॉस्पिटलायझेशन आणि अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागलेल्या मुलांची संख्याही बऱ्यापैकी वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे ज्यांची वैद्यकीयदृष्ट्या खूप काळजी घेण्याची गरज आहे, अशा लोकसंख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे भारतात लहान मुलं आणि 18 वर्षांखालच्या तरुणांनाही लसीकरण कार्यक्रमात सामावून घेणं गरजेचं झालं आहे, 'असं त्यांनी लिहिलं होतं.

मुलांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या राज्यांत काय सुरू आहे?

दिल्ली (Delhi) : मुलांच्या संरक्षणासाठी विशेष कृती दलाचं नियोजन केलं आहे. तसंच पुरेसे बेड्स, ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचं चांगलं व्यवस्थापन या अनुषंगाने काही निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 20 मे रोजी सांगितलं.

कर्नाटक (Karnataka) : राज्याच्या महिला-बालविकास मंत्री शशिकला जोल्ले यांनी मुलांमधल्या कोविडचं व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली. प्रत्येक जिल्ह्यात पेडिअॅट्रिक कोविड सेंटर्स उभारली जाणार असून, अनाथांसाठी पुनर्वसन केंद्रं उभारली जाणार आहेत.

महाराष्ट्र (Maharashtra) : येत्या दोन महिन्यांत 12 वर्षांखालच्या मुलांसाठी पेडिअॅट्रिक कोविड केअर फॅसिलिटी उभारली जाणार असल्याचं बृहन्मुंबई महापालिकेने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. ज्यांचे पालक कोविडमुळे हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्या पालन-पोषणासाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

हे वाचा - कोरोनामुक्त कुटुंबातील चिमुरड्यांचं आरोग्य धोक्यात! जखडतोय विचित्र आजार

दरम्यान, उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने लहान मुलांच्या संरक्षणासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 19 मे रोजी बालरोगतज्ज्ञांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. जिल्ह्यातल्या एकूण कोविडबाधितांपैकी 8 टक्के रुग्ण मुलं असल्याचं त्याांनी सांगितलं. मुलांसाठी स्वतंत्र कोविड वॉर्ड उभारले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

बालहक्क संघटना

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने 20 मे रोजी सांगितलं, की मुलांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकारने सज्ज राहायला हवं. आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना पत्र लिहिलं असून, दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या मुलांचं प्रमाण जास्त असून, तिसऱ्या लाटेत ते आणखी असू शकतं, असं मत त्यांनी पत्रात व्यक्त केलं आहे.

नॅशनल इमर्जन्सी ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसच्या पुनर्संघटनाची गरज त्यांनी व्यक्त केली असून, या सेवा आणि अँब्युलन्सनी लहान मुलं आणि नवजात बालकांच्या दृष्टीने सज्ज राहण्याकरिताचे आदेश आरोग्य मंत्रालयाने देण्याची विनंती त्यांनी पत्रात केली आहे. राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यसचिव यांनाही त्यांनी पत्रं लिहिली आहेत. नवजात बालकं, मुलं यांच्यासाठीच्या अतिदक्षता विभागांचं कार्य कसं सुरू आहे, याबद्दलची माहितीगोळा करण्यासाठी आयोगाने एक विशिष्ट फॉरमॅट तयार केल्याचं त्यांनी त्या पत्रात लिहिलं आहे.

मुलांचं लसीकरण (Child Vaccination)

जगातल्या बहुतांश देशांत प्रौढांचं लसीकरण सुरू असलं,तरी काही देशांत मुलांचं लसीकरणही सुरू झालं आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेच्या संचालिका रोशेल वॅलेन्स्की यांनी 18 मे रोजी सांगितलं, की फायझर-बायोएनटेकच्या लशीला 12 ते 15 वयोगटासाठी मान्यता देण्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात सहा लाख मुलांना लस देण्यात आली आहे. 2021 च्या अखेरीला किंवा 2022 च्या सुरुवातीला चार ते सहा या वयोगटातल्या मुलांना लशी दिल्या जाण्याची शक्यता तज्ज्ञ अँथनी फाउची यांनी व्यक्त केली.

सिंगापूरने शाळा बंद केल्या आहेत. 12 ते 15 या वयोगटातल्या मुलांचं लसीकरण त्या देशात सुरू होणार असल्याचं आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी सांगितलं. फायझर बायोएनटेकची लस आता तिथं केवळ 16 वर्षांवरील व्यक्तींना दिली जात आहे. फायझरचीच (Pfizer-BioNTech) लस संयुक्त अरब अमिरातीतही त्या वयोगटातल्या मुलांना दिली जात आहे.

हे वाचा - खळबळजनक! कोरोनापाठोपाठ Mucormycosis सुद्धा लहान मुलांपर्यंत पोहोचला

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) श्रीमंत देशांना आवाहन केलं आहे, की मुलांना लस देण्याआधी गरीब देशांना लशींचे डोस दिले जावेत.

भारतात मुलांचं लसीकरण कधी?

भारतात सध्या दोनच लशींना परवानगी मिळाली आहे. त्यापैकी एकाही लशीच्या लहान मुलांवरच्या ट्रायल्सचा डेटा उपलब्ध झालेला नाही.

दोन ते 18 या वयोगटातल्या मुलांवर लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या घेण्यासाठी भारत बायोटेकला (Bharat Biotech) भारतीय औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. येत्या 10 ते 12 दिवसांत त्या सुरू होतील. अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या लशीच्याही ट्रायल्स सहा ते 17 या वयोगटासाठी सुरू आहेत; मात्र त्याचा डेटा अद्याप हाती आलेला नाही.

फायझरने मे महिन्याच्या सुरुवातीला सांगितलं, की आपल्या लशीला भारतात परवानगी मिळण्यासाठी सरकारी यंत्रणेबरोबर चर्चा सुरू आहे. दरम्यान, कर्नाटकातल्या बेळगावमधल्या 20 मुलांना झायडस कॅडिला (Zydus Cadilla) या कंपनीच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीचा भाग म्हणून झायकोव्ह-डी या लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

हे वाचा - कोरोना लस मिळेपर्यंत कसं करावं स्वत:चा बचाव, तज्ज्ञांनी सांगितला सोपा मार्ग

जॉन्सन अँड जॉन्सनचं जानसेन आणि रशियाचं स्पुतनिक-V ही व्हॅक्सिन्स भारतात येणार आहेत. मात्र 18 वर्षांखालच्यांना ती कधी देण्यात येतील, याची अद्याप कल्पना नाही.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Small child