लखनऊ, 15 जानेवारी : भाजपचे सर्वात आक्रमक आणि हिंदुत्ववादी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता विधानसभा निवडणुकांना (Uttar Pradesh Assembly Election 2022) सामोरे जाण्यास सज्ज झाले आहेत.ते स्वतः गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आदित्यनाथ (Yogi Adityanath) वयाच्या 21 व्या वर्षी कुटुंब सोडून गोरखपूरला आले होते. त्यांचे वडील 24 वर्षांपूर्वी उत्तराखंडमधील एका गावातून संन्यासाची दीक्षा घेतलेल्या आपल्या मुलाचं मन वळवण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. आई निराश झाली, पण मुलासाठी प्रार्थना करत राहिली. आज तो संन्यासी मुलगा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
संन्यास घेतल्यानंतर मुलाचं नाव आणि राहण्याचे ठिकाणही बदलले. उत्तराखंडच्या पंचूर गावचे अजय सिंह बिश्त आज सत्तेच्या शिखरावर पोहोचले आहेत. उत्तराखंडच्या पौरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले योगी चार भाऊ आणि तीन बहिणींमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे आहेत. त्यांचे दोन भाऊ महाविद्यालयात काम करतात, तर एक भाऊ लष्कराच्या गढवाल रेजिमेंटमध्ये सुभेदार आहे. योगी आदित्यनाथ यांनी पौरी गढवाल या गावातून सन्यास ते राजकारणापर्यंत बराच पल्ला गाठला आहे.
UP Election: ठरलं ! अयोध्या, मथुरा, देवबंद नाही तर 'या' मतदारसंघातून योगी आदित्यनाथ लढवणार निवडणूक
वयाच्या 21 व्या वर्षी सोडलं घरदार
योगी आदित्यनाथ यांचे खरे नाव अजय सिंह बिश्त आहे. योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या छोट्याशा गावात झाला, त्यांच्या वडिलांचे नाव आनंद सिंह बिश्त आहे, जे याच गावात राहतात. योगी आदित्यनाथ उर्फ अजय सिंह नेगी यांचे भाऊ महेंद्रसिंग बिश्त यांनी सांगितले, की आदित्यनाथ यांच्या मनात लहानपणापासूनच सेवेची भावना होती. मात्र, आपला भाऊ मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचेल, असे त्यांना कधीच वाटले नव्हते. महेंद्रसिंग म्हणाले की, त्यांच्यात नेहमीच समाजसेवेची भावना होती. त्याच दिशेने ते पुढे गेले आहेत. वयाच्या 21 व्या वर्षी घरदार सोडून योगी 1993 मध्ये गोरखपूरला आल्याचे त्यांच्या भावाने सांगितले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भाजपने पहिल्या टप्प्यातील 57 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचाही समावेश आहे. आदित्यनाथ त्यांच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. यूपी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच योगी आदित्यनाथ यांच्या जागेबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अयोध्या, देवबंदसह अनेक ठिकाणांहून ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र भाजपने पुन्हा एकदा गोरखपूरमधूनच योगी आदित्यनाथ यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Yogi Aadityanath, Yogi government