मुंबई, 17 मे : सौंदर्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया किती धोकादायक असतात हे पुन्हा एकदा समोर आलं आलं आहे. कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री चेतना राज (chethana raj Death) यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्लास्टिक सर्जरीमुळे अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. वजन कमी करण्यासाठी त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी केल्याचं सांगितलं जात आहे. या शस्त्रक्रियेनंतर काही चुकीमुळे त्यांना दुसऱ्या दिवशी फुफ्फुसात समस्या जाणवू लागली, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. कॉस्मेटिक सर्जरीने झालेला हा काही पहिलाच मृत्यू नाही. मात्र, या घटनेनंतर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. प्लॅस्टिक सर्जरी किती धोकादायक आहे? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
ब्रिटिश असोसिएशन ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जनच्या आकडेवारीनुसार, प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आहेत. यापैकी एकामध्ये सिलिकॉनचा वापर करून ब्रेस्ट-हिपला आकर्षक बनवले जाते, तर दुसरे म्हणजे चेहऱ्याशी संबंधित कॉस्मेटिक सर्जरी, हे बदल काहींसाठी वरदान तर काहींसाठी चुकीचा निर्णय ठरत आहेत. त्याचे धोके टाळण्यासाठी आणि चांगल्या परिणामांसाठी अनुभवी कॉस्मेटिक सर्जन आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
लिपोसक्शन: शरीराच्या काही भागांची चरबी कमी करून आकार देणे
हात, मांड्या, कंबर अशा शरीराच्या काही भागांमध्ये चरबी जास्त प्रमाणात जमा होते. कधीकधी ही शस्त्रक्रिया मुलांच्या छातीवरील अतिरिक्त फुगवटा काढून टाकण्यासाठी केली जाते. शरीरातील अतिरिक्त चरबी काढून अवयव चांगल्या आकारात आणले जातात. त्याची किंमत 1.50 ते दोन लाख आहे.
खबरदारी: विश्रांती घ्या आणि जास्त हालचाल टाळा. वैद्यकीय सल्ल्याने काही दिवस व्यायाम करू नका. योग्य प्रमाणात पाणी प्या. 6-7 दिवस प्रेशर कपडे घाला जेणेकरून शरीर आकारात येईल.
जोखीम: शरीरातील जळजळ निघून जाण्यासाठी एक ते दीड महिना लागू शकतो. त्वचा निस्तेज होऊ शकते आणि रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. वेदना देखील राहू शकतात.
रायनोप्लास्टी: नाकाच्या सौंदर्यासाठी
या कॉस्मेटिक सर्जरीचा उपयोग नाकाला योग्य आकार देण्यासाठी केला जातो. सामान्यत: नाक चेहऱ्याच्या प्रमाणात मोठे असणे, जास्त चपटे असणे किंवा नाकपुड्या मोठ्या होणे अशी स्थिती असते तेव्हा रायनोप्लास्टी केली जाते. या शस्त्रक्रियेस 3-4 तास लागू शकतात. यास जास्त वेळ लागल्यास, तुम्हाला एक किंवा दोन दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल. तज्ञांनी 20 वर्षांच्या वयानंतरच हे करण्याची शिफारस केली आहे. याची किंमत सुमारे दीड ते अडीच लाख रुपये आहे.
खबरदारी : उन्हात जाणे टाळा आणि किमान 4 तास विश्रांती घ्या. झोपताना, आपले डोके वर ठेवा आणि नाकाऐवजी तोंडाने श्वास घ्या, कमी बोलणे आणि जड वस्तू उचलणे टाळा. सर्जनच्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.
जोखीम : शस्त्रक्रियेच्या चार आठवड्यांनंतर स्थिती सामान्य होते. परंतु, काही प्रकरणांमध्ये, नाकातील सूज दूर होण्यास जास्त वेळ लागू शकतो. शस्त्रक्रियेतून चट्टे येऊ शकतात आणि रक्तस्त्राव होऊ शकतो.
महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' छोट्या बदलांकडे कधीच करू नये दुर्लक्ष, असतात गंभीर आजाराचे संकेत
फेसलिफ्ट: चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी
या शस्त्रक्रियेचा वापर चेहऱ्यावरील सुरकुत्या काढण्यासाठी केला जातो. यासाठी स्ट्रेचवर चेहऱ्याच्या त्वचेवरील सुरकुत्या दूर केल्या जातात. या शस्त्रक्रियेला 2-3 तास लागतात. त्याचा प्रभाव 8-10 वर्षे टिकतो. या शस्त्रक्रियेच्या मदतीने डोळ्यांजवळ, हनुवटी किंवा तोंडाजवळ लटकलेली त्वचा घट्ट केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो.
खबरदारी: शस्त्रक्रियेनंतर वाकून कोणतेही काम करू नका. जड वजन उचलणे टाळा कारण यामुळे चेहऱ्यावर ताण येतो. शिंकताना काळजी घ्या आणि काही दिवस कसरत करू नका.
जोखीम : चेहऱ्यावर सूज येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये रक्तस्त्राव किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. वेदना देखील असू शकतात.
ब्लेफेरोप्लास्टी: धनुष्य आकाराच्या भुवयांसाठी
बहुतेक स्त्रिया ही शस्त्रक्रिया करतात. यामध्ये लटकलेल्या भुवयांना वर आणून आकारात आणले जाते, ज्यामुळे तुम्ही तरुण दिसता. याशिवाय लटकलेली त्वचाही व्यवस्थित केली जाते. त्याची किंमत 70 हजार ते 1 लाख रुपये आहे.
खबरदारी: शस्त्रक्रिया केलेल्या जागेला स्पर्श करू नका किंवा घासू नका. सूर्यापासून स्वतःचे रक्षण करा आणि किमान दोन आठवडे लेन्स घालू नका.
जोखीम : सूर्यप्रकाश संवेदनशील असू शकते. याशिवाय डोळे कोरडे होऊ शकतात.
ब्रेस्ट एन्हेंसमेंट : स्तनाला आकार देते
या शस्त्रक्रियेला ब्रेस्ट ऑगमेंटेशन किंवा बूब जॉब असेही म्हणतात. यामध्ये स्तन घट्ट व मोठे करून त्याला योग्य आकार दिला जातो. ही शस्त्रक्रिया अनेक प्रकारे केली जाते. यामध्ये सिलिकॉन किंवा सलाईन ब्रेस्ट इम्प्लांट किंवा फॅट असे विविध प्रकारचे इम्प्लांट वापरले जातात. 2-3 तास लागतात आणि सुमारे 1-2 लाख रुपये खर्च येतो.
खबरदारी: दोन महिन्यांपर्यंत जड वजन उचलण्यास मनाई आहे. याशिवाय, शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्पोर्ट्स ब्रा घालण्याचा सल्ला दिला जातो. वेदना आणि संसर्ग टाळण्यासाठी काही औषधे दिली जातात. सूज आल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
जोखीम: स्तनामध्ये गाठ होण्याचा धोका आहे, चाचणी करून ते शोधले जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, ही शस्त्रक्रिया 2-3 महिन्यांत पुन्हा करावी लागते. स्तनामध्ये वेदना होऊ शकते किंवा इम्प्लांट गळती होण्याचा धोका असू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.