नुसांतारा, 20 जानेवारी: इंडोनेशियाच्या संसदेत मंगळवारी एक कायदा पास करण्यात आला. या कायद्यानुसार इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून बोर्निओमधील नुसांतारा येथे हलवण्यात येणार आहे. सध्याची राजधानी जकार्ता खूपच गजबजली असल्याने नव्या ठिकाणी राजधानी हलवण्याचा निर्णय इंडोनेशियातील सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. इंडोनेशियामध्ये जावा बेट समूहाचा समावेश होतो. या जावा बेटांवरील जावनीज भाषेत नुसांतारा शब्दाचा अर्थ द्वीप समूह असा होतो त्यामुळे 80 नावांतून या नावाची निवड करण्यात आली आहे. तसंच या नावाचा संबंध इंडोनेशियामध्ये शेकडो वर्षांपूर्वी असलेल्या हिंदू साम्राज्याशीही आहे.
या नवीन राजधानीच्या नावाचा उगम 14व्या शतकातील एका गोष्टीत झालेला आढळतो. इसवी सनाच्या 14 व्या शतकात इंडोनेशियात मजापहित साम्राज्याचे राजे राज्य करत होते. या राज्याचा प्रधानमंत्री गजाह माडा आणि त्याचा हिंदू राजा हयाम वुरुक यांनी असा पण केला होता की जोवर नुसांतारा जिंकून घेत नाही तोवर कुठलाच मसाल्याचा पदार्थ खाणार नाही. माडाने कुठल्याही परिस्थितीत आपला पण पूर्ण करायचाच असं ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्यानं आत्ताचे सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई, दक्षिण थायलंड आणि दक्षिण-पश्चिम फिलिपिन्समध्ये तिमोर लेस्टे जिंकून घेत संपूर्ण द्वीपसमूहांचे एकीकरण केले. हेच ते नुसांतारा! या एकत्रित हिंदू साम्राज्यावरूनच इंडोनेशियाच्या नव्या राजधानीचं नाव नुसांतारा ठेवण्यात आल्याचं साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
हे वाचा-मोरारजी देसाई म्हणाले होते 'लिटिल गर्ल' मग त्यांनाच पराभूत करुन झाल्या पंतप्रधान
गजह माडा एक शूर योद्धा होता, ज्याचा अतुलनीय पराक्रम इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला होता.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातील व्यापारी आणि धर्मगुरु आग्नेय आशियात आले होते. त्याच काळात इंडोनेशियातही इतिहासावर हिंदू राज्यांनी इथं साम्राज्य प्रस्थापित केली होती ती 16 शतकापर्यंत अस्तित्वात होती. त्यापैकीच मजापहित हे एक हिंदू साम्राज्य. हे राज्य 16 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे इस्लामिक सैन्याने इंडोनेशियाचा बहुतांश भाग जिंकेपर्यंत सत्तेत होते असे सांगण्यात येते. हिंदू पौराणिक कथांमध्ये सांगितलेलं विष्णूचं वाहन म्हणजे गरुड, हाच गरुड इंडोनेशियाचं राष्ट्रीय चिन्ह आहे.
हिंदू संस्कृतीचा एवढा पगडा असूनही जगातील सर्वांत जास्त मुस्लिम लोकसंख्या इंडोनेशिया येथेच आढळते. तर तेथील हिंदूंची लोकसंख्या चार दशलक्षांहून अधिक आहे. इस्लामिक शासन असूनही इंडोनेशियाच्या इतिहासावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. बाली, सुलावेसी (मध्य, दक्षिण आणि आग्नेय), मध्य कालीमंतन आणि दक्षिण सुमात्रा हे असे प्रदेश आहेत जिथे मोठ्या प्रमाणात हिंदू समुदाय आहे. इंडोनेशियन हिंदू धर्मात इंडोनेशियन अॅनिमिस्ट विचारसरणी, हिंदू आणि बौद्ध धर्माचा संगम दिसून येतो.
हे वाचा-मृत व्यक्तीला जिवंत करण्यासाठी अमेरिकेतील प्रयोगशाळेत मृतदेहांचे जतन!
साधारण 216 मैल परिसरात असलेली ही नवीन राजधानी पूर्व कालीमंतन प्रांतात स्थित असेल. "या (राजधानी) मध्ये केवळ सरकारी कार्यालये नसतील, आम्हाला एक नवीन स्मार्ट महानगर तयार करायचं आहे जे जागतिक प्रतिभावंतांना आकर्षित करेल आणि नवकल्पना केंद्र बनू शकेल," असं इंडोनेशियन अध्यक्ष जोको विडोडो यांनी वृत्तसंस्था AFPला सांगितलं. इंडोनेशियाचे मंत्री सुहर्सो मोनोआरफा म्हणाले, ''राजधानीच्या शहराचं नाव निश्चित करण्यासाठी 80 नावांची यादी केली होती. त्यातून जगाला माहीत असलेलं आणि सर्वोत्तम नाव म्हणून नुसांतारा हे नाव निवडण्यात आलं.''
बाली बेटावरचे जगप्रसिद्ध शिल्पकार न्योमन नुआर्टा यांनी तयार केलेलं गरुड विष्णू केनकाना (GWK) शिल्प खूप प्रसिद्ध आहे. त्यांनाच इंडोनेशियाच्या नवीन अध्यक्षीय संकुलाची रचना करण्याचं काम देण्यात आलं होतं. इंडोनेशियाची ही नवी राजधानी कशी असेल याची आता सर्वच इंडोनेशियन लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.