पुणे, 15 डिसेंबर : बांगलादेश मुक्ती युद्धात (Bangladesh Liberation War) भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सैन्याला असा धडा शिकवला की पुन्हा ते भारताकडे नजर वर करुन बघणार नाही. यात आपल्या अनेक जवानांना वीरमरण आले. यापैकी पुण्यात जन्मलेल्या अरुण खेत्रपाल यांनी जो पराक्रम दाखलवला त्यासाठी त्यांना मरणोत्तर सर्वोच्च सैनिक पुरस्कार परमवीर चक्राने सन्मानित केलं. अरुण खेत्रपाल यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत तीन टँकसह पाकिस्तानच्या 10 टँकचा सामना केला. मृत्यू डोळ्यासमोर असतानाही त्यांनी माघार न घेता शत्रूचा अखेरचा टँकही उध्वस्त केला.
पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत पूर्वेकडील सेक्टरमधून भारतीय लष्कराचा दबाव संपवायचा होता. या योजनेतंर्गत पाकिस्तानने दोन कट रचले होते. राजस्थानच्या लोंगेवाला Longewala post of Rajasthan) पोस्टवरून भारतावर हल्ला करून जैसलमेर काबीज करण्याचा पहिला कट होता. त्याचवेळी सियालकोट बेसच्या मदतीने शकरगडमार्गे पंजाबमधील पठाणकोट ताब्यात घेण्याचा दुसरा कट होता. पठाणकोट ताब्यात घेऊन पाकिस्तानला जम्मू-काश्मीरमधून उर्वरित भारताशी संपर्क तोडायचा होता. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या योजनेवर कारवाई करण्यापूर्वी भारतीय लष्कराने शकरगड भागात हल्ला करून तो आपल्या ताब्यात घेतला. पाकिस्तानातील शकरगढ भागात झालेल्या रणगाड्यांमधली ही भीषण लढाई बसंतरची लढाई (Battle of Basantar) म्हणून ओळखली जाते.
बसंतर नदीवर पूल बांधून शकरगढमध्ये भारतीय सैन्याचा हल्ला
पठाणकोट काबीज करण्याच्या इराद्याने पाकिस्तानने बसंतर नदीच्या काठावरील शकरगड परिसरात तीन पायदळ तुकड्या, एक आर्मर्ड डिव्हिजन आणि एक आर्मर्ड ब्रिगेड तैनात केले होते. येथे, पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्यासाठी भारतीय लष्कराची 3 इन्फंट्री डिव्हिजन आणि 2 आर्मर्ड ब्रिगेड बसंतर नदीच्या या बाजूला पोहोचली होती. भारतीय लष्कराच्या क्षमतेबद्दल शत्रूला शंका नव्हती. भारतीय लष्कर लवकरच नदीवर पूल बांधून हल्ला करणार हे त्यांना माहीत होते.
भारतीय लष्कर आणि त्यांच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी शत्रूने बसंतर नदीच्या काठावर भूसुरुंग पेरले होते. येथे 47 इन्फंट्री बटालियन आणि 17 पूना हॉर्स यांनी 15 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता बसंतर नदीवर पूल बांधण्याचे काम पूर्ण केले. पूल बांधल्याबरोबर भारतीय लष्कराच्या अभियांत्रिकी शाखेने माइनफील्ड साफ करण्यास सुरुवात केली. माइनफिल्ड साफ करण्याचे काम अर्धेच पूर्ण झाले होते, तेव्हाच पाक सैनिकांच्या कारवायांची एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली. या माहितीत असेही सांगण्यात आले की, शत्रूचे सैन्य आपल्या टँक ब्रिगेडसह त्यांच्या दिशेने येत आहे.
शत्रूच्या 10 रणगाड्यांचा सामना करण्यासाठी तीन भारतीय रणगाडे युद्धभूमीत
शत्रूच्या आगमनाची बातमी मिळाल्यावर कॅप्टन व्ही. मल्होत्रा, लेफ्टनंट अहलावत आणि द्वितीय लेफ्टनंट अरुण खेत्रपाल हे त्रिकूट भूसुरुंगाची पर्वा न करता आपल्या रणगाड्यांसह शत्रूच्या दिशेने निघाले. काही वेळातच शत्रूच्या दहा रणगाड्यांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय सैन्याच्या तीन रणगाडे समोर होते. युद्धाच्या सुरूवातीस कॅप्टन मल्होत्रा, लेफ्टनंट अहलावत आणि सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल या त्रिकुटाने शत्रूचे सात टँक नष्ट केले.
शत्रूच्या सैन्याच्या तीन टँक अजूनही रणांगणावर आगीचा वर्षाव करत होत्या. कॅप्टन मल्होत्रा यांच्या रणगाड्याला शत्रूच्या रणगाड्यातून डागलेल्या गोळ्याचा फटका बसला तर लेफ्टनंट अहलावत यांच्या रणगाड्यात तांत्रिक बिघाड झाला. शत्रूचे तीन टँकचा सामना करण्याची जबाबदारी एकट्या सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्यावर आली होती. शत्रूच्या तीन टँकना आता सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या रणगाड्याला कोणत्याही किंमतीत लक्ष्य करायचे होते.
खेत्रपाल यांच्या रणगाडा शत्रूकडून लक्ष्य…
बसंतरच्या लढाईत शत्रू सैन्याचा एकच रणगाडा उरला होता. सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल शत्रूच्या या रणगाड्याकडे वळले, त्याआधी शत्रूच्या रणगाड्यातून एक गोळा त्यांच्या रणगाड्यावर पडला. अरुण खेत्रपाल यांच्या टँकमध्ये ज्वाळा वाढत होत्या. ही परिस्थिती पाहून त्याच्या युनिट कमांडरने टँक सोडून परत येण्यास सांगितले. मात्र, अरुण खेत्रपाल आपल्या युनिट कमांडरचा हा आदेश मानायला तयार नव्हते.
त्यांनी आपल्या युनिट कमांडरला प्रत्युत्तर दिले, 'सर, मी माझ्या रणगाड्याला अशा अवस्थेत सोडू शकत नाही, तो अजूनही कार्यरत आहे, मी या शत्रूंना संपवूनच परत येईन.' तोपर्यंत शत्रू सैन्याची तिसरी टँक अरुण खेत्रपाल यांच्यापासून फक्त 100 मीटरवर पोहोचली होती. वेळ न दवडता त्यांनी शत्रूच्या रणगाड्याला लक्ष्य करायला सुरुवात केली. त्यानंतर सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या मशीनगनमधून निघालेल्या गोळ्यांनी शत्रूच्या सैन्याचा महाकाय रणगाडा उद्ध्वस्त केला.
शत्रूचे 4 रणगाडे उद्ध्वस्त करणारे अरुण खेत्रपाल यांचा रणगाडा आता पूर्णपणे आगीच्या कचाट्यात सापडला होता. खेत्रपाल यांना या टँकमधून बाहेर पडणे आता अशक्य झाले होते. 'बसंतरच्या लढाई' दरम्यान, द्वितीय लेफ्टनंट अरुण खेत्रपाल शत्रूशी लढताना वीरगतीला प्राप्त झाले. खेत्रपाल यांच्या शौर्याबद्दल आणि पराक्रमासाठी त्यांना लष्कराचा सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र हा पुरस्कार देऊन मरणोत्तर सन्मानित करण्यात आलं.
पुण्यात जन्म..
अरुण खेत्रपाल यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1950 रोजी पुणे शहरातील एका लष्करी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एमएल खेत्रपाल हेही त्यावेळी भारतीय सैन्यात ब्रिगेडियर म्हणून कार्यरत होते. 1967 मध्ये त्यांनी नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये लष्करी जीवन सुरू केले. 13 जून 1971 रोजी त्यांना 17 पूना हॉर्समध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले. 1971 च्या भारत-पाक युद्धात वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचे सर्वोच्च बलिदान दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Pakistan army, War hero