नवी दिल्ली, 9 जून : देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 25 जुलैला संपत आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाची निवडणूक (Presidential election) लवकरच होणार आहे. लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 62 नुसार विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतींची निवड होणं आवश्यक आहे. त्यामुळे आता या संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे.
निवडणूक आयोगाने आजच (9 जून) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. बिनविरोध निवड न झाल्यास 18 जुलैला मतदान होणार असून, 21 जुलै रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विशिष्ट अशी प्रक्रिया (Process) असते. `लाइव्ह हिंदुस्थान डॉट कॉम`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
भारतीय निवडणूक आयोगानं (Election Commission of India) गुरुवारी (9 जून) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगानं घडामोडींना वेग आला आहे. देशात इलेक्टोरल कॉलेज (Electoral College) प्रणालीद्वारे राष्ट्रपतींची निवड होते. यासाठी खासदार (MP) आणि आमदार (MLA) मतदान (Voting) करतात. ही संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली पार पडते. यात प्रक्रियेतलं इलेक्टोरल कॉलेज म्हणजे काय हे जाणून घेऊ या. वरच्या आणि खालच्या सभागृहात निवडून आलेल्या सदस्यांचा इलेक्टोरल कॉलेजमध्ये समावेश असतो. तसंच यामध्ये राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचाही समावेश होतो. या सदस्यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकली, तर यंदाच्या निवडणुकीत 4896 मतदार असतील. त्यात 543 लोकसभा खासदार, 233 राज्यसभा खासदार आणि सर्व राज्यांच्या मिळून एकूण 4120 आमदारांचा समावेश आहे.
सर्वसामान्यपणे निवडणुकीत मतदार एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला मत देतात. परंतु, इलेक्टोरल कॉलेज प्रक्रियेत मतदार उमेदवारांची नावं बॅलट पेपरवर (Ballot Paper) पसंतीच्या क्रमाने लिहितात. खासदार आणि आमदारांनी दिलेल्या मतांचं मूल्य एकापेक्षा जास्त असतं. एकीकडे लोकसभा आणि राज्यसभेतल्या खासदारांच्या मतांचं मूल्य 708 असतं, तर दुसरीकडे आमदाराच्या मताचं मूल्य राज्यांमधल्या लोकसंख्येसारख्या गोष्टींवर अवलंबून असतं. आमदाराच्या मतांची गणना करण्यासाठी, राज्याच्या लोकसंख्येला विधानसभेतल्या आमदारांच्या संख्येने भागलं जातं. यातून आलेल्या संख्येला पुढे एक हजारांनी भागलं जातं. राज्यानुसार पाहिल्यास उत्तर प्रदेशातल्या एका आमदाराच्या मताची किंमत सर्वाधिक 208 आहे, तर अरुणाचल प्रदेशात हा आकडा 8 आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार केवळ बहुमताच्या जोरावर जिंकत नाही, तर त्याला विशिष्ट मतांचा कोटा मिळवावा लागतो. मतमोजणीच्या वेळी, निवडणूक आयोग सर्व इलेक्टोरल कॉलेजच्या वतीनं कागदी मतपत्रिकेद्वारे टाकलेल्या सर्व वैध मतांची मोजणी करतो. उमेदवाराला एकूण पडलेल्या मतांपैकी 50 टक्के आणि एक अतिरिक्त मत मिळवावं लागतं.
लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या मतांचं मूल्य 5 लाख 59 हजार 408 आहे. आमदारांच्या बाबतीत ही संख्या 5 लाख 49 हजार 495 आहे. त्यामुळे इलेक्टोरल कॉलेजचा आकडा 10 लाख 98 हजार 903 वर पोहोचतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President ramnath kovind, Voting