Explainer: शेवटच्या त्या 10 सेकंदांत काय घडलं? ISRO चं उपग्रह प्रक्षेपण का झालं अयशस्वी? वाचा

Explainer: शेवटच्या त्या 10 सेकंदांत काय घडलं? ISRO चं उपग्रह प्रक्षेपण का झालं अयशस्वी? वाचा

काय घडणं आवश्यक असतं आणि प्रत्यक्षात नेमकं काय घडल्यामुळे प्रक्षेपण अयशस्वी ठरलं, याबद्दलची थोडी माहिती घेऊ या.

  • Share this:

श्रीहरीकोटा, आंध्रप्रदेश, 12 ऑगस्ट: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अर्थात 'इस्रो'च्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकलद्वारे (GSLV) जीसॅट-1 (GISAT-1) हा अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट (EOS-3) निर्धारित कक्षेपर्यंत पोहोचवण्यात गुरुवारी (12 ऑगस्ट) अपयश आलं. प्रक्षेपणासह सुरुवातीच्या सर्व टप्प्यांतल्या गोष्टी नियोजनाबरहुकूम पार पडल्या; मात्र शेवटच्या म्हणजेच क्रायोजेनिक स्टेजमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रक्षेपण यशस्वी होऊ शकलं नाही, अशी माहिती 'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांनी दिली. काय घडणं आवश्यक असतं आणि प्रत्यक्षात नेमकं काय घडल्यामुळे प्रक्षेपण अयशस्वी ठरलं, याबद्दलची थोडी माहिती घेऊया.

क्रायोजेनिक स्टेज म्हणजे काय?

क्रायोजेनिक स्टेज हा उपग्रह प्रक्षेपकाचा शेवटचा टप्पा असतो. त्यात अत्यंत कमी तापमानात जड वस्तू (म्हणजे उपग्रह) उचलून अंतराळात नियोजित ठिकाणी सोडल्या जातात. क्रायोजेनिक इंजिन पुढे जाण्यासाठी द्रवरूप ऑक्सिजन (Liquid Oxygen) आणि द्रवरूप हायड्रोजनचा (Liquid Hydrogen) वापर करतं. हे दोन्ही वायू वेगवेगळ्या टाक्यांमध्ये भरलेले असतात. तिथून ते टर्बो पंपच्या (Turbo Pump) साह्याने इन्डिव्हिज्युअल बूस्टर पंपमध्ये पाठवले जातात. कम्बश्चन चेंबरमध्ये (Combustion Chamber) या प्रॉपेलंट (Propellent) (म्हणजे पुढे जाण्यास मदत करणाऱ्या) घटकांच्या प्रवाहाचा उच्च वेग कायम राखण्यासाठी हे पंपिंग केलं जातं.

उड्डाणावेळी नेमकं काय झालं?

'आज तक'च्या वृत्तात दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँच पॅडवरून GSLV-F10 हा प्रक्षेपक उपग्रहाला घेऊन अवकाशात झेपावला. उड्डाणानंतर दोन मिनिटं आणि 29 सेकंदांनंतर पहिल्या स्टेजमधले म्हणजे रॉकेटच्या सर्वांत खालच्या भागातले स्ट्रॅपऑन बूस्टर्स वेगळे झाले. तेव्हा 9679 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रक्षेपकाचा प्रवास सुरू होता. उड्डाणानंतर दोन मिनिटं आणि 31 सेकंदांनंतर प्रक्षेपकाची पहिली स्टेज (GS-1) प्रक्षेपकापासून वेगळी झाली. त्याच्या एक सेकंद आधी दुसरी स्टेज (GS-2) सुरू झाली होती. या स्टेजसह उपग्रह 13,729 किलोमीटर प्रति तास या वेगाने निर्धारित स्थळाच्या दिशेने आगेकूच करत होता. त्याच वेळी उपग्रहाच्या वरच्या भागावरचं म्हणजे रॉकेटच्या सर्वांत वरच्या भागावरचं कव्हर वेगळं झालं.

उड्डाणानंतर चार मिनिटं 51 सेकंदांनी दुसरी स्टेज संपली. त्यानंतर चार सेकंदांनी दुसरी स्टेज रॉकेटपासून वेगळी झाली. तेव्हा रॉकेटचा वेग ताशी 18 हजार 741 किलोमीटर एवढा होता. इथपर्यंत सगळं नियोजनाप्रमाणे पार पडल्यामुळे श्रीहरिकोटा इथल्या नियंत्रण केंद्रामध्ये आनंदाचं वातावरण होतं.

उड्डाणानंतर चार मिनिटं 56 सेकंदांनी तिसरी स्टेज (GS-3) कार्यान्वित झाली. तिला क्रायोजेनिक इंजिन (Cryogenic Engine) असंही म्हणतात. त्याच वेळी नियंत्रण कक्षाशी (Control Room) रॉकेटचा संपर्क तुटला. तरीही कम्प्युटरवर अधूनमधून डेटा येत होता. त्यामुळे हे व्यवस्थित होईल, असं शास्त्रज्ञांना वाटत होतं.

उड्डाणानंतर 18 मिनिटं 29 सेकंदांनी क्रायोजेनिक इंजिन बर्नआउट (Burn Out) व्हायला हवं होतं. ते झालं नाही. तसंच, 18 मिनिटं 39 सेकंदांनी ही मिशन संपताना ते उपग्रहापासून वेगळं व्हायला हवं होतं. तेही झालं नाही. या शेवटच्या 10 सेकंदांमध्ये क्रायोजेनिक इंजिन आणि सॅटेलाइट यांच्याशी असलेला संपर्क पूर्णच तुटला. त्यानंतर शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला. मिळालेल्या माहितीच्या आधारे शास्त्रज्ञांनी के. सिवन यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यानंतर त्यांनी क्रायोजेनिक इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मोहीम पूर्णतः यशस्वी होऊ न शकल्याचं जाहीर केलं.

हे प्रक्षेपण महत्त्वाचं का होतं?

या प्रक्षेपणाद्वारे भारताचा जीसॅट-1 हा अत्याधुनिक इमेजिंग सॅटेलाइट (Imaging Satellite) प्रक्षेपित केला जाणार होता. त्यावर बसवलेल्या हाय-रिझॉल्युशन कॅमेऱ्यांमुळे भारतासाठी तो गेमचेंजर ठरणार होता. कारण या उपग्रहाद्वारे भारतीय भूमी आणि सागरी हद्द यांवर सातत्याने (Real Time) लक्ष ठेवणं शक्य होणार होतं. देशाच्या सीमासुरक्षेसंदर्भात या उपग्रहाची मोठी मदत होणार होती. तसंच, वेगवेगळ्या प्रकारच्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचनाही याद्वारे मिळू शकणार होती. त्यामुळे पुरेशा उपाययोजना करून त्या आपत्तींमुळे होणारं नुकसान कमी करण्यास मदत झाली असती. कृषी, जंगलं, खनिजं, ढगांचे गुणधर्म, बर्फ, हिमनद्या, सागर आदींमधले बदल टिपू शकतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे त्या उपग्रहावर बसवलेले होते. मल्टी स्पेक्ट्रल व्हिजिबल अँड नीअर इन्फ्रारेड (6 बँड्स), हायपर स्पेक्ट्रल व्हिजिबल अँड नीअर इन्फ्रारेड (158 बँड्स) आणि हायपर स्पेक्ट्रल शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड (256 बँड्स) असे तीन प्रकारचे कॅमेरे या उपग्रहावर बसवण्यात आले होते. पहिल्याचं रिझॉल्युशन 42 मीटर, दुसऱ्याचं 318 मीटर, तर तिसऱ्याचं रिझॉल्युशन 191 मीटर एवढं होतं.

व्हिजिबल कॅमेरे (Visible Camera) दिवसा फोटो टिपू शकतात. तसंच इन्फ्रारेड कॅमेरे (Infreared Camera) रात्रीच्या अंधारातही फोटो टिपू शकतात, नजर ठेवू शकतात. तसंच, कोणत्याही हवामानात फोटो टिपण्याचीही या कॅमेऱ्यांची क्षमता होती. या कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण भारताची भूमी आणि सागरी भाग यांचे दर अर्ध्या तासाला फोटो टिपले जाणार होते. त्यांचा वापर गरजेनुसार 'इस्रो'चे शास्त्रज्ञ किंवा देशातल्या कोणत्याही यंत्रणा करू शकणार होत्या.

हे वाचा -  Work From Home करताना तणावात आहात? चिंता करू नका; या टिप्स येतील कामी

मोहिमेतल्या वेगळ्या गोष्टी

या वेळी 'इस्रो'ने प्रथमच सकाळच्या वेळेत उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. याआधी या वेळेत कधीही अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइटचं प्रक्षेपण करण्यात आलं नव्हतं. सकाळच्या वेळेत वातावरण ढगाळ नसण्याचा फायदा घेण्यासाठी, तसंच सूर्यप्रकाशात प्रक्षेपित झालेल्या रॉकेटवर नजर ठेवणं सोपं जावं, म्हणून ही वेळ ठरवण्यात आली होती.

तसंच, 'इस्रो'ने आतापर्यंत कधीही जिओ ऑर्बिट अर्थात पृथ्वीपासून 36 हजार किलोमीटरवरच्या स्थिर कक्षेत रिमोट सेन्सिंग (Remote Sensing) अर्थात अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट (Earth Observation Satellite) पाठवला नव्हता. प्रक्षेपण यशस्वी झालं असतं, तर हा उपग्रह त्या बाबतीत पहिला ठरला असता.

आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे या वेळी प्रथमच चार मीटर व्यासाचा ओजाइव्ह (Ogive) म्हणजेच कमानीसारख्या आकाराचा उपग्रह जीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या पुढच्या भागात ठेवण्यात आला होता.

आधीपासूनच रखडलेली मोहीम

जीसॅट वन हा उपग्रह पाच मार्च 2020 रोजी प्रक्षेपित केला जाणार होता. तांत्रिक अडचणीमुळे त्या दिवशीचं प्रक्षेपण रद्द करण्यात आलं. त्यानंतर देशात कोरोना संसर्ग सुरू झाला. लॉकडाउनही लागू झालं. त्यामुळे प्रक्षेपण लांबणीवर पडत गेलं. त्यानंतर 28 मार्च 2021 ही तारीख प्रक्षेपणासाठी निश्चित करण्यात आली; मात्र त्या वेळीही एका किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे ते एप्रिलपर्यंत पुढे ढकललं गेलं. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे अखेर 12 ऑगस्ट 2021 ही तारीख निश्चित करण्यात आली. आज प्रक्षेपण व्यवस्थित झालं; मात्र शेवटच्या टप्प्यात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे अखेर प्रक्षेपण अयशस्वी ठरलं. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 18 छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतरचं 'इस्रो'चं 2021 या वर्षातलं हे दुसरंच प्रक्षेपण होतं.

First published: August 12, 2021, 9:15 PM IST

ताज्या बातम्या