नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : कोरोना (Corona) संसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या SARS-CoV 2 या विषाणू म्हणजेच कोविड -19 (Covid-19) च्या जीनोम सीक्वेन्सिंगचा उलगडा करत एक वर्षाच्या आत वैज्ञानिकांना कोरोना प्रतिबंधक लशीची (Corona Vaccine) निर्मिती करण्यात यश आलं. या कालावधीत लशीची ट्रायल घेत, ती लोकांना देणंही सुरू झालं. लोकांचं पूर्ण लसीकरण झाल्यानंतर त्यांचा कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो, अशी शक्यता लसीकरणामुळे (Corona Vaccination) निर्माण झाली. पण पूर्ण लसीकरण होऊनही लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसू लागला तेव्हा लसीकरणही निष्प्रभ ठरू लागल्याचं स्पष्ट होऊ लागलं. त्यामुळे आता कोरोनाचा तिसरा डोस (Corona vaccine dose) म्हणजे बूस्टर डोस (Booster Dose) चर्चेत आहे.
कोरोना व्हायरसच्या डेल्टा (Delta) व्हेरियंटचा प्रादुर्भाव लस घेतलेल्या लोकांना होत असल्याचं दिसून येताच चिंतेत भर पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काही देश कोरोना प्रतिबंधक लशीचे अतिरिक्त डोस देण्याच्या तयारीत आहेत. यालाच बूस्टर डोस असं म्हटलं जात आहे. तथापि, काही लोक या बूस्टर डोस म्हणण्यास आक्षेप घेत आहेत. कोरोना लशीचा पहिला डोस हा प्राथमिक असून, दुसरा डोस हा बूस्टर डोस आहे, असं या लोकांचं म्हणणं आहे. सध्या इस्रायलनं (Israel) बूस्टर डोसच्या दिशेनं पावलं उचलल्याचं पाहून अन्य देशही अतिरिक्त डोस देण्यासाठी पुढं सरसावत आहेत.
खरंच बूस्टर डोस हा अधिक चांगला आणि दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतो का? जरं असं असेल तर संपूर्ण लोकसंख्येसाठी किती डोसची गरज भासेल? यामुळे सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं का, अशा सर्व प्रश्नांवर बोलताना प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि पब्लिक हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष के. श्रीकांत रेड्डी यांनी सांगितलं, की अदयाप बूस्टर डोस देणं सुरू झालेलं नाही, त्यामुळं यावर उत्तरंही उपलब्ध नाहीत.
हे वाचा - भारतीयांसाठी खूशखबर! COVAXIN ला या आठवड्यात WHO कडून मंजुरी मिळण्याची शक्यता
टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित झालेल्या लेखात डॉ. रेड्डी यांनी म्हटलं आहे, की ‘फायझर-बीएनटी लशीच्या दोन डोसच्या तुलनेत तीन डोसमुळे क्लिनिकल इन्फेक्शनचा (Clinical Infection) धोका 11 पटीनं कमी झाला असल्याचा दावा इस्रायलमध्ये अलीकडेच झालेल्या संशोधनातून करण्यात आला आहे. तसंच गंभीर संसर्गाचा धोका 15 पटीनं कमी झाला आहे. या संशोधनात 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 40 लाख नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, 60 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील व्यक्तींना याचा कितपत फायदा होईल, याविषयी कोणताही पुरावा मिळालेला नाही.’
‘प्रमाणित डोस अंतर्गत देण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीमुळे लोकांचा आजारी पडण्यापासून, रुग्णालयात भरती होण्यापासून किंवा मृत्यूपासून बचाव झाला. ज्या देशात लसीकरणाचा दर अधिक आहे, तिथं हे चित्र पाहायला मिळालं. आता इस्रायलनं ज्या लोकांनी पाच महिन्यांपूर्वी लसीचे डोस घेतले आहेत, अशा 12 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा अतिरिक्त डोस देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं डॉ. रेड्डी यांनी आपल्या लेखात नमूद केलं आहे.
हे वाचा - Explainer: पुन्हा Lockdown होणार का? सध्याची परिस्थिती काय सांगते?
‘जेव्हा लसीकरणाचं प्रमाण कमी असतं आणि कोरोना विषाणू लोकांमध्ये सक्रियपणे पसरलेला असतो, तेव्हा अधिक संसर्गजन्य आणि लसीलाही निष्प्रभ करणारे नवे व्हेरियंट (Variant) समोर येण्याची दाट शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बूस्टर डोसच्या विरोधात युक्तीवाद केला आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या तसेच ज्येष्ठ नागरिकांना लसीचा अतिरिक्त डोस दिला जाऊ शकतो, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. अतिरिक्त डोस देण्याची घाई न करता संपूर्ण लोकसंख्येचं लसीकरण कसं होईल, यावर भर दिला जात असल्याचं चित्र भारतात आहे. दरम्यान, जे घटक अधिक संवेदनशील आहेत, त्यांना अतिरिक्त डोस देण्याचा विचार केला जात आहे. हे एक चांगलं पाऊल म्हणता येईल,’ असं डॉ. रेड्डी यांनी लेखात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.