Home /News /explainer /

कुठे मंदिरात मशीद तर कुठे मशिदीत चर्च! फक्त भारतातचं नाही तर या देशामध्येही झालंय इमारतींचं 'धर्मपरिवर्तन'

कुठे मंदिरात मशीद तर कुठे मशिदीत चर्च! फक्त भारतातचं नाही तर या देशामध्येही झालंय इमारतींचं 'धर्मपरिवर्तन'

भारतात इमारतींचं धर्म परिवर्तन (Conversion) करण्यावरुन वाद सुरू आहे. मात्र, हे फक्त भारतातच होतंय असं नाही. जगभरातील अनेक देशांमध्ये इमारतींचं धर्मपरिवर्तन करण्यात आलं आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

  मुंबई, 16 मे : देशात काशी विश्वनाथ मंदिर (Kashi Vishwanath Temple) आणि ज्ञानवापी मशिदींनंतर (Gyanvapi Musjid) आता ताजमहालवरून वादाला सुरुवात झाली आहे. खूप दिवसांपासून एक पक्ष याला हिंदूंचे मंदिर सांगत आहे. कोणी त्याला शिवमंदिर तर कोणी तेजोमहाल असल्याचा दावा करत आहे. यापूर्वी बाबरी मशिद पाडून तिथली भूमी राममंदिरासाठी दिली आहे. अजूनही देशातील अनेक ठिकाणी अशाच प्रकारचा दावा करुन इमारतींचं धर्म परिवर्तन करण्याचा दावा केला जात आहे. मात्र, हे फक्त भारतातच होतंय असं नाही. जगभरातील अनेक देशांमध्ये इमारतींचं धर्मपरिवर्तन करण्यात आलं आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. हागिया सोफियाचा इतिहास काय? तुर्कीने त्याचं मशिदीत का रूपांतर केलं? (history of Hagia Sophia) जगभरात प्रसिद्ध असलेल्या इस्तंबूलमधील हागिया सोफिया संग्रहालयाचे पुन्हा मशिदीत रूपांतर करण्यात येईल, असा निकाल न्यायालयाने जुलै 2020 मध्ये दिला. हे 6 व्या शतकात तुर्कीमध्ये कॅथेड्रल म्हणून बांधले गेले. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनीही हागिया सोफिया मशीद म्हणून उघडण्याची घोषणा केली. या इमारतीची 1500 वर्षांपूर्वी ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन कॅथेड्रल म्हणून रचना करण्यात आली होती. मात्र, मे 1453 मध्ये ऑट्टोमन शासक महमूद II याने इस्तंबूल काबीज केल्यावर तिचे मशिदीत रूपांतर झाले. 1500 वर्षे जुन्या इमारतीची ओळख बदलू नये, असे सांगत या संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर करण्यावरुन आंतरराष्ट्रीय इशाराही तुर्कीला मिळाला होता. Hagia Sophia 900 वर्षे चर्च म्हणून ओळखले गेले. यानंतर 500 वर्षे मशीद आणि नंतर संग्रहालय म्हणून ओळखली जात होती. 1934 मध्ये त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आणि आता ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. हागिया सोफिया हे इस्तंबूल आणि तुर्कीचा इतिहास सांगणारे स्मारक आहे. त्याला आयसोफिया असेही म्हणतात. ही इमारत प्रथम कॅथेड्रल म्हणून बांधण्यात आली होती. नंतर आधुनिक तुर्की काळात तिचे रूपांतर मशीद आणि संग्रहालयात करण्यात आले. ही इमारत तुर्कीच्या इतिहासाचा आणि विरोधाभासाचा जिवंत दस्तऐवज आहे. कारण ती कॅथेड्रल ते मशिदीपर्यंत आणि मशिदीपासून संग्रहालयापर्यंत प्रवास करते. तुर्कस्तानच्या धर्मनिरपेक्ष समाजाचे प्रतीक म्हणून ही इमारत ओळखली जाते. इस्तंबूलच्या या प्रतिष्ठित संरचनेचे बांधकाम सुमारे AD 532 मध्ये बायझंटाईन साम्राज्याचा शासक जस्टिनियनच्या कारकिर्दीत सुरू झाले, त्या वेळी हे शहर कॉन्स्टँटिनोपल किंवा कुस्तुनतुनिया म्हणून ओळखले जात होते. कंबोडियातील सर्वात मोठे विष्णू मंदिराला बौद्ध स्वरूप कसं आलं? History of Angkor Wat अंगकोर वाट हे कंबोडियामधील जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे, जे सुमारे 162.6 हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. हे मूळतः ख्मेर साम्राज्यात भगवान विष्णूचे हिंदू मंदिर म्हणून बांधले गेले होते. मेकाँग नदीच्या काठावर सिमरीप शहरात बांधलेले हे मंदिर आजही जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे, जे शेकडो चौरस मैलांमध्ये पसरले आहे. हे मंदिर मेरू पर्वताचेही प्रतीक आहे. त्याच्या भिंतींवर भारतीय धार्मिक ग्रंथांचे चित्रण आहे. या मालिकांमध्ये अप्सरांचं अतिशय सुंदर चित्रण करण्यात आलं आहे, असुर आणि देवतांमध्ये समुद्रमंथनाचं दृश्यही दाखवलं आहे. सनातन धर्म मानणारे ते आपले पवित्र तीर्थस्थान मानतात.

  या देशाने शेकडो मशिदींना चर्चमध्ये का बदललं? मुस्लिम मागतायेत नमाजचा अधिकार

  पौराणिक काळातील कंबोजदेश, कालचा कंपुचिया आणि आजचा कंबोडिया आहे. आधी हिंदू आणि नंतर बौद्ध झाला. शतकानुशतके 27 राजांनी येथे राज्य केले. काही हिंदू, काही बौद्ध. त्यामुळेच दोन्ही धर्मातील देवदेवतांच्या मूर्ती देशभर विखुरल्या आहेत. कंबोडियामध्ये बौद्ध अनुयायांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे भगवान बुद्धांची मूर्ती सर्वत्र आढळते. पण अंगकोरवाट व्यतिरिक्त, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही मूर्ती एकत्र असतील अशी क्वचितच जागा असेल. जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर 12 व्या शतकात खमेर राजवंशातील सूर्यवर्मन II या हिंदू शासकाने बांधले होते. परंतु, चौदाव्या शतकापर्यंत येथे बौद्ध धर्माशी संबंधित लोकांची राजवट प्रस्थापित झाली आणि मंदिराला बौद्ध स्वरूप देण्यात आले. बौद्ध रूप धारण केल्यानंतर अनेक वर्षे या मंदिराची ओळख जवळजवळ नष्ट झाली होती. मात्र, नंतर एका फ्रेंच पुरातत्वशास्त्रज्ञाने ते पाहिले आणि पुन्हा एकदा हे बहुमोल आणि विलासी मंदिर जगासमोर मांडले. अनेक लोक या मंदिराला जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणतात. जेव्हापासून या ठिकाणी बौद्धांनी आपली सत्ता स्थापन केली तेव्हापासून येथे बौद्ध धर्माच्या महायान शाखेतील अवलोकितेश्वराची पूजा केली जाते. 13व्या शतकाच्या अखेरीस, अंगकोर वाटच्या संरचनेच्या सुशोभीकरणाचे कामही मंदावले. आणि त्याच वेळी थेरवाद बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली एक संयमित धर्म उदयास येऊ लागला. 15 व्या शतकापासून ते 19 व्या शतकापर्यंत, थेरवादाच्या बौद्ध भिक्षूंनी अंगकोर वाट मंदिराची काळजी घेतली, परिणामी अनेक आक्रमणे होऊनही मंदिराचे फारसे नुकसान झाले नाही. स्पेनमधील कॉर्डोबा आधी चर्च नंतर मशीद पुन्हा चर्च Cathedral of Córdoba असाच एक चर्च म्हणजे कॉर्डोबाचे कॅथेड्रल (Cathedral of Córdoba). याला कॉर्डोबाची ग्रेट मशीद म्हणूनही ओळखले जाते. जुन्या कथांनुसार, सुमारे 1300 वर्षांपूर्वी लेरिन्सच्या सेंट व्हिन्सेंटच्या नावावर एक छोटेसे चर्च होते. 784 मध्ये, अब्द-अल-रहमान नावाच्या शासकाने एक मोठी मशीद बांधण्याचा आदेश दिला. या चर्चच्या जागेवर त्या मोठ्या मशिदीचे काम सुरू झाले. ही इतकी भव्य इमारत आहे की ती अनेक राज्यकर्त्यांनी मिळून बांधली होती. सुमारे 300 वर्षांपासून येथे नमाज अदा केली जात होती. मात्र, जेव्हा ख्रिस्ती शासकाने 1236 मध्ये कॉर्डोबा पुन्हा ताब्यात घेतलं, तेव्हा या मशिदीचे चर्चमध्ये रूपांतर झाले. त्याचे रूपांतर रोम कॅथेड्रल चर्चमध्ये करण्यात आलं. सन 2000 पासून स्पेनमधील अनेक मुस्लिम संघटना या चर्चमध्ये नमाज अदा करण्यासाठी परवानगी मागत आहेत. मात्र, त्यांना यश मिळालेले नाही. मुस्लिमांना नमाज अदा करू न देण्यामागे व्हॅटिकन सिटीचा दबाव असल्याचे सांगितले जाते. मुस्लिम संघटनांची इच्छा आहे की त्यांनी या चर्चमध्ये अनेक वर्षांपासून नमाज अदा केला आहे. परंतु, या संघटनांच्या मागण्या ऐकल्या जात नाहीत. ज्ञानवापी मशिदीची तीस वर्षांपूर्वी मागणी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराजवळ ज्ञानवापी मशीद आहे. सध्या इथं मुस्लिम समाज दिवसातून पाच वेळा सामूहिक नमाज अदा करतो. ही मशीद अंजुमन-ए-इंतजामिया समिती चालवते. 1991 मध्ये स्वयंभू देवता विश्वेश्वर भगवान यांच्या वतीने वाराणसीच्या दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जात दावा करण्यात आला आहे की, ज्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद आहे, तेथे पूर्वी विश्वेश्वराचे मंदिर असायचे आणि शृंगार गौरीची पूजा केली जात असे. मुघल शासकांनी हे मंदिर तोडून येथे मशीद बांधली होती. अशा परिस्थितीत ज्ञानवापी संकुल मुस्लिमांच्या ताब्यातून रिकामे करून हिंदूंच्या ताब्यात द्यावे. त्यांना शृंगार गौरीची पूजा करण्याची परवानगी द्यावी. ताजमहाल की तेजोमहल? Taj Mahal ताजमहालमधील शिव मंदिराबाबत अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित होत आहेत. पूर्वी तेजोमय किंवा तेजोमहाल नावाचे महादेवाचे मंदिर होते. शाहजहानने मंदिर तोडून त्या जागी ताजमहाल बांधल्याचा दावा अनेक इतिहासकार करतात. याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ला ताजमहालच्या 22 खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून हिंदूंच्या मूर्ती आणि शिलालेख तेथे लपलेले आहेत की नाही हे स्पष्ट होईल. खरे तर ताजमहाल की तेजो महालय हा वाद जेव्हा इतिहासकार पी.एन. ओक यांचे "ट्रू स्टोरी ऑफ ताज" हे पुस्तक समोर आले तेव्हा सुरू झाला. ओक यांनी आपल्या पुस्तकात ताजमहाल हे शिवमंदिर असल्याबाबत अनेक दावे केले आहेत. या पुस्तकात राजा जयसिंग यांच्या आज्ञेचा उल्लेख करण्यात आला आहे. सोबतच ताजमहालमध्ये गणेशाच्या अनेक आकृती, कमळाचे फूल आणि नागाच्या आकाराचे दर्शन झाल्याचा दावा करण्यात आला.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Tajmahal, Temple

  पुढील बातम्या