दिल्ली, 10 मार्च: आपण आपल्याला हवी असलेली एखादी वस्तू बाजारपेठेतून खरेदी करतो. ती वस्तू खराब निघाली तर दुकानदारानं ती बदलून द्यावी अशी आपली अपेक्षा असते. काही वेळा ते शक्य होते काही वेळा नाही. अनेकदा मोठ्या वस्तू खराब निघाल्यास मोठे नुकसान होते, अशावेळी दाद कुठे मागायची असा प्रश्न ग्राहकाला पडतो. आपले अधिकार (Consumer Rights) काय आहेत, याबाबतही अनेक ग्राहक अनभिज्ञ असतात. त्यांच्या या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख… ग्राहक म्हणजे नेमके कोण ? ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार, (Consumer Protection Act 2019) ग्राहक (Consumer) म्हणजे अशी एखादी व्यक्ती जी कोणताही माल (Goods) खरेदी करते किंवा कोणतीही सेवा (Service) भाडेतत्वावर वा खरेदी करते. यात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींच्या व्यवहारांचा समावेश आहे. टेलिशॉपिंग, डायरेक्ट सेलिंग किंवा मल्टीलेव्हल मार्केटिंग द्वारे विक्री करण्यात आलेल्या वस्तू,सेवांचाही यात समावेश आहे. ग्राहक कोण नाही? कोणतीही व्यक्ती जी पुनर्विक्रीसाठी (Reselling) किंवा व्यावसायिक (Commercial) कारणांसाठी वस्तू विकत घेते ती ग्राहक नाही. ग्राहकांचे हक्क (Consumer Rights) काय आहेत? जीवाला धोका पोहोचवणाऱ्या वस्तू आणि सेवांपासून संरक्षण मिळण्याचा हक्क ग्राहकांना आहे. वस्तू आणि सेवांविषयी सर्व माहिती घेण्याचा, वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तेबाबत खात्री करून घेण्याचा, ऐकण्याचा, शंका निवारण करून घेण्याचा आणि यासंदर्भातील माहिती घेण्याचा हक्क ग्राहकांना आहे. ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी त्रिस्तरीय न्यायालयीन यंत्रणेची भूमिका एक कोटीपेक्षा कमी किमतीबाबतच्या तक्रारी जिल्हास्तरीय न्यायालयाच्या कक्षेत येतात. एक कोटीपेक्षा जास्त पण १०० कोटीपेक्षा कमी किमतीच्या तक्रारी राज्य आयोगाच्या कक्षेत येतात. तर दहा कोटीपेक्षा जास्त किमतीबाबतच्या तक्रारी राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या कक्षेत येतात. आता वस्तू किंवा सेवेच्या किंमतीनुसार तक्रार दाखल करण्यासाठी कार्यक्षेत्र निवडले जाते. यापूर्वी नुकसान भरपाईच्या मुल्यानुसार तक्रार कोणत्या आयोगाकडं करायची हे ठरवलं जात असे. ग्राहकांसाठी माहितीचा अधिकार काय आहे? प्रत्येक ग्राहकास त्यानं घेतलेल्या वस्तू आणि सेवांबाबत सर्व माहिती घेण्याचा अधिकार आहे. नुकसान भरपाई मिळवण्याचा ग्राहकांचा हक्क : ग्राहकांचे काही नुकसान झाले असेल तर त्याला किंवा तिला नुकसान होण्याच्या प्रमाणात भरपाई घेण्याचा हक्क आहे. (हे वाचा: Explainer : प्रवासी आणि वाहन उत्पादकांसाठी Airbags बाबत नव्या नियमांचा अर्थ काय? ) उत्पादनांचे प्रमाणीकरण म्हणजे काय? ग्राहकांची सुरक्षा, आरोग्य आणि हित लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण उत्पादने विकसित करण्यासाठी काही निकष घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार असलेल्या उत्पादनांना प्रमाणित उत्पादनांचा दर्जा दिला जातो. ग्राहक संरक्षण आयोगाचे (Consumer Protection Council) कार्य काय आहे? ग्राहकांनी आपली फसवणूक झाल्यास तक्रार कशी आणि कुठे करावी, याबाबत मार्गदर्शन करण्याचं काम ही यंत्रणा करते. न्यायालयांमध्ये ग्राहकांचे प्रतिनिधित्व करणं आणि ग्राहकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याचं कामही याद्वारे केले जाते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.