मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer : चीनवर घोंघावतंय का घोंघावतंय पिवळं विनाशकारी वादळ? दशकातलं सर्वांत भयंकर थैमान

Explainer : चीनवर घोंघावतंय का घोंघावतंय पिवळं विनाशकारी वादळ? दशकातलं सर्वांत भयंकर थैमान

Beijing Sand storm: दशकातल्या सर्वांत मोठ्या वादळाने चीनची राजधानी धुळीच्या पांघरुणाखाली गेली आहे.  चीनच्या म्हणण्यानुसार हे वादळ मंगोलियातल्या गोबी वाळवंटामुळे आलं आहे; पण...

Beijing Sand storm: दशकातल्या सर्वांत मोठ्या वादळाने चीनची राजधानी धुळीच्या पांघरुणाखाली गेली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार हे वादळ मंगोलियातल्या गोबी वाळवंटामुळे आलं आहे; पण...

Beijing Sand storm: दशकातल्या सर्वांत मोठ्या वादळाने चीनची राजधानी धुळीच्या पांघरुणाखाली गेली आहे. चीनच्या म्हणण्यानुसार हे वादळ मंगोलियातल्या गोबी वाळवंटामुळे आलं आहे; पण...

बीजिंग, 17 मार्च: चीनमध्ये सध्या वाळूच्या मोठ्या वादळाने (Sandstorm) थैमान घातलं आहे. अशा प्रकारचं हे दशकातलं सर्वांत मोठं वादळ असल्याचं म्हटलं जात आहे. चीनच्या म्हणण्यानुसार हे वादळ मंगोलियातल्या (Inner Mongolia) गोबी वाळवंटामुळे (Gobi Desert) आलं आहे; मात्र जपानसह अमेरिकाही या वादळासाठी चीनच्या धोरणांना जबाबदार ठरवत आहे.

चीनच्या राजधानीचं शहर असलेल्या बीजिंगमध्ये (Beijing) उठलेल्या या वादळाने संपूर्ण शहराला वेढून टाकलं. या वादळाचं वैशिष्ट्य म्हणजे या वादळामुळे आकाशाचा रंग पिवळा-नारिंगी होऊन गेला. अशा प्रकारचं वादळ जवळपास दर वर्षी गोबीच्या वाळवंटातून चीनमध्ये येतं; मात्र या वर्षी त्याची तीव्रता दशकातली सर्वांत जास्त होती.

चीनच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दशकातलं सर्वांत विनाशकारी असलेलं हे वादळ मंगोलियाच्या अंतर्गत भागात असलेल्या गोबीच्या वाळवंटातून आलं. या वादळाने बीजिंगसह हेबेई, गान्शू अशा अनेक शहरांना आपल्या कवेत घेतलं. शिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मंगोलियात परिस्थिती आणखी बिकट असून, तिथे या वादळामुळे 341 जण बेपत्ता झाले आहेत. चीनचं हे पिवळ्या रंगाचं वादळ शेजारी देशांना अनेकदा घाबरवत असतं. 2020च्या ऑक्टोबर महिन्यातही वाळवंटात असंच विनाशकारी वादळ उठलं होतं.

त्यानंतर उत्तर कोरियाने आपल्या देशवासीयांना घरातून बाहेर न पडण्याचं फर्मान काढलं होतं. या पिवळ्या धुळीद्वारे कोरोना विषाणूही पसरू शकतो, अशी भीती उत्तर कोरियाला वाटत होती.

Yellow Dust अर्थात पिवळ्या धुळीमुळे या वादळाला पिवळं वादळ म्हणतात. चीन आणि इनर मंगोलियातून उडणारी ही धूळ पिवळ्या रंगाची असते. तिला चायना डस्ट (China Dust) किंवा एशियन डस्ट असंही म्हणतात. दर वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांदरम्यान ही धूळ उडताना दिसते. त्याचं कारण म्हणजे या कालावधीत वाहणारे जोरदार वारे. या वाऱ्यांमुळे वाळूचे हलके कण वाळवंटातून उडून चीनसह उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि जपानचा आसमंतही व्यापून टाकतात. त्याची तीव्रता इतकी जास्त असते, की काही वेळा ही धूळ अमेरिकेच्या वातावरणावरही परिणाम करते. दर वर्षी थंडीच्या हंगामात होणारी ही घटना या वर्षी मार्य महिन्यात कशी काय घडली, याचं कोडं उकलण्याचा प्रयत्न हवामानशास्त्रज्ञ करत आहेत.

गोबीच्या वाळवंटावर चीनचं खापर

अशा वादळांचं कारण गोबी वाळवंट असल्याचं सांगून चीन वारंवार त्या वाळवंटावर याचं खापर फोडत आला आहे. हे वाळवंट चीनच्या वायव्येकडून इनर मंगोलियापर्यंत पसरलेलं आहे. वेगवान वाऱ्यांसह वाळूचे बारीक कण उडून शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. त्यामुळे वाळूचं वादळ येतं. या वादळासाठी चीनही जबाबदार असल्याचं अमेरिका सातत्याने म्हणत आला आहे. 80च्या दशकात चीनमध्ये औद्योगिकीकरण वेगाने वाढलं. जंगलं कापून कारखाने वाढत गेले. त्यामुळे वाळवंटातून आलेल्या वादळाला प्रतिकार करण्यासाठी काही माध्यमच उरलेलं नाही. तसंच, उद्योगांमधून बाहेर पडणारी दूषित हवाही या वादळात मिसळली जाऊ लागली. त्यामुळे ते अधिक धोकादायक बनू लागलं.

सोव्हिएतही कारणीभूत

तत्कालीन सोव्हिएत संघ (आताचा रशिया) असताना आमू आणि सिर या नद्यांची दिशा बदलण्यात आली होती. त्यामुळे कझाकस्तान आणि उझबेकिस्तानसारख्या प्रदेशांमध्ये दुष्काळ पडू लागला. सोव्हिएत अॅग्रिकल्चर प्रोग्रामअंतर्गत (Soviet Agriculture Programme) दोन्ही नद्यांची दिशा बदलून ती मध्य आशियातल्या वाळवंटांकडे करण्यात आली होती, जेणेकरून त्या भागात कापसाची शेती होऊ शकेल. मात्र कझाकस्तान आणि उझबेकिस्तान हे दुष्काळी प्रदेश होऊ लागल्यामुळे तिथेही या धुळीला प्रतिबंध करण्यासाठी काही व्यवस्था नाही. त्यामुळे पावसाळा संपल्यावर आणि थंडी सुरू होण्याच्या मधल्या काळात अशी ही वाळूची पिवळी वादळं चीनसह सगळ्या शेजारी देशांना अडचणीत आणतात.

किती धोकादायक?

चीनमधल्या धुळीत सिलिकॉनची (Silicon) मात्रा 24 ते 32 टक्क्यांपर्यंत असते, असं अभ्यासात आढळलं आहे. तसंच, त्यात अॅल्युमिनियम, कॅल्शियम, पारा, कॅडमियम अशी घातक द्रव्यंही असतात. श्वासावाटे ही द्रव्यं शरीरात गेली, तर फुप्फुसांना गंभीर संसर्ग होतो. फुप्फुसांचा कॅन्सर (Lung Cancer) होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. धुळीचे कण खूपच बारीक असतात. ते थेट रक्तात मिसळून गर्भात असलेल्या बाळामध्ये गंभीर विकृतीही घडवू शकतात.

(हे वाचा:  पाकिस्तानात ज्यांच्या समाधीस्थळाची तोडफोड झाली ते स्वामी अद्वैतानंद कोण?)

सध्या सुरू असलेल्या वादळामुळे बीजिंग शहरातल्या हवेचा दर्जा एकदम बिघडला आहे. सोमवारी सकाळी (15 मार्च) ही स्थिती अत्यंत खराब होती. हवेतलं पार्टिक्युलेट मॅटर अर्थात PM10चं प्रमाणही वाढलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे वाढलेलं प्रमाण फुप्फुसांना तातडीने हानी पोहोचवतो.

चीनमधून उठणारी ही पिवळी वादळं उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या रागाचं कारण ठरली आहेत. या दोन्ही कोरियन देशांच्या हवेमधले 30 टक्के सल्फ्युरिक अॅसिड आणि 40 टक्के नायट्रिक अॅसिड हे घातक घटक चीनच्या वातावरणातून येतात. त्यामुळे या बाबतीत अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरही आवाज उठवण्यात आला आहे. येलो डस्टच्या बाबतीत काही पावलं उचलण्याची गरज जपाननेही चीनकडे व्यक्त केली आहे. अनेक तज्ज्ञांनी सल्ले देऊनही चीन मात्र सातत्याने झाडं तोडून उंच इमारती आणि कारखाने बांधण्याच्या मागे लागला आहे.

First published:

Tags: China