नवी दिल्ली, 9 मार्च : सध्याचं जग हे सोशल मीडियाशी (Social Media) कनेक्टेड आहे. मनोरंजन, माहिती, चर्चा, बातम्या आदींसाठी लोकं सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सोशल मिडीया हे एकमेकांना जोडणारं साधन झालं आहे. असं असताना सोशल मिडीयावरुन व्हायरल केली जाणारी काही माहिती, व्हिडिओ अगदी बातम्यादेखील पाहिल्यानंतर हे खरंय का? असा प्रश्न युझर्सच्या मनात येतो. बातम्यांचा विचार करता, अनेकदा ही तर फेक न्यूज (Fake News) आहे, अशी प्रतिक्रिया देखील युझर्सकडून कमेंट स्वरुपात मिळते. मग या फेक न्यूज म्हणजे काय, त्याचे प्रकार, फेक न्यूजच्या अनुषंगाने कायदे नेमके काय आहेत हे जाणून घेऊया. फेक न्यूज म्हणजे काय? फेक न्यूज म्हणजे अशा बातम्या किंवा फिचर्स की ज्यामधील मजकूर हा चुकीचा, बनावट किंवा तयार केलेला असतो. त्यातील तपशील, सोर्सेस, माहिती कोण देतंय यांची सत्यता तपासलेली नसते. फेक न्यूजचे प्रकार कोणते? - उपहासात्मक (Satire) किंवा विडंबनात्मक. परंतु कोणालाही न दुखवण्याचा हेतू नसलेल्या. - दिशाभूल करणारा (Misleading) कंटेंट - तोतया कंटेंट - बनावट कंटेंट - चुकीचे (False) संदर्भ - चुकीच्या पध्दतीने हाताळलेला कंटेंट बनावट किंवा फेक बातम्यांचा परिणाम नियंत्रित करण्यासाठी कायदे (Laws) फेक न्यूजमुळे समाजावर अनेक प्रकारे परिणाम होतात. हे परिणाम अनेकदा कायदा व सुव्यवस्थेशी, गुन्हेगारीशी संबंधित असू शकतात. त्यामुळे अशा फेक न्यूज रोखण्यासाठी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 मधील कलम 66 डी, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 54, भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 153, 499, 500, 505 (1) यानुसार फेक न्यूजच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येते. A) जर गुन्हा इलेट्रॉनिक कम्युनिकेशनशी (Electronic Communication) संबंधित असेल तर, या परिस्थितीत कोणत्याही व्यक्तीने कम्युनिकेशन डिव्हाईस आणि कॉम्प्युटर रिसोर्सेसव्दारे फसवणूक केल्यास सदर व्यक्तीस आयटी कायद्याच्या कलम 66 डी अंतर्गत शिक्षा दिली जाते. B) नैसर्गिक आपत्तीशी (Disaster) संबंधित फेक न्यूज – जर कोणी व्यक्ती आपत्ती किंवा त्याच्या तीव्रतेबद्दल चुकीची सूचना देईल किंवा आपत्तीस कारणीभूत ठरेल, त्या व्यक्तीस आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 54 अन्वये शिक्षा दिली जाते. C) फेक न्यूजच्या माध्यमातून चुकीची माहिती देणे किंवा निर्माण करणे – जनतेत भिती निर्माण होईल असे विधान, अफवा किंवा बातमी प्रसारित केल्यास अशा व्यक्तीस आयपीसीच्या कलम 505 (1) अन्वये शिक्षा दिली जाते. (हे वाचा: Explainer : भारत-चीन सीमावादामुळे हवामान बदलाच्या संशोधनावर होतोय परिणाम) D) फेक न्यूजमुळे दंगल (Riots) झाल्यास – जो कोणी द्वेषमूलक किंवा बेकायदेशीरपणे एखादे कृत्य करीत असेल किंवा अशा प्रकारचे कृत्य करण्यास चिथावणी देण्यास कारणीभूत ठरत असेल तर त्याविरोधात आयपीसीच्या कलम 153 अन्वये गुन्हा दाखल होतो. E) बदनामीस कारणीभूत माहिती – बोलणे, वाचण्याच्या हेतूने शब्दांव्दारे, खाणाखूणा करुन किंवा दृश्यमान घटकाव्दारे एखाद्या व्यक्तीला मानसिक इजा किंवा अवहेलना व्हावी या हेतूने मजकूर प्रकाशित करणारी व्यक्ती आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अन्वये दंडनीय मानहानीसाठी जबाबदार असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.