Home /News /entertainment /

VIDEO:'तुम्ही 'पावनखिंड' साजरा करताय,आम्ही धन्य झालो', प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चिन्मय मांडलेकर भावुक

VIDEO:'तुम्ही 'पावनखिंड' साजरा करताय,आम्ही धन्य झालो', प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चिन्मय मांडलेकर भावुक

शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'पावनखिंड' चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान चिन्मय मांडलेकरची (Chinmay Mandlekar) एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

  मुंबई, 2 मार्च- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील अनेक शौर्यगाथा आपल्याला माहिती आहेत. अशीच एक शौर्यगाथा म्हणजे ‘पावनखिंड’ (Pawankhind) चा थरार. हा पावनखिंडचा थरार प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळत आहे. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 18 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान चिन्मय मांडलेकरची   (Chinmay Mandlekar)  एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. यामध्ये त्याने चित्रपट OTT वर रिलीज न करता चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्याचं कारण सांगितलं आहे. 'पावनखिंड' या मराठी चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेता अजय पुरकरने शूर वीर बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवसात इतके प्रचंड शो होणार हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. प्रेक्षक या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत.
  अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत एक पोस्टसुद्धा लिहिली आहे. यामध्ये चिन्मयने लिहिलं आहे, 'गेल्या दोन वर्षात अनेकांनी विचारलं "पावनखिंड OTT वर का प्रदर्शित करत नाही?" हे आहे त्याचं उत्तर. स्वास्थ्यासाठी सामाजिक अंतर राखायलाच हवं. पण सामाजिक स्वास्थ्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी साजरं ही करायला हवं. प्रेक्षकहो तुम्ही 'पावनखिंड' साजरा करताय. आम्ही धन्य झालो'! अशी भावनिक पोस्ट चिन्मयने शेअर केली आहे. (हे वाचा:Jhund पाहून आमिर खानने आकाश ठोसरला मारली कडकडून मिठी! म्हणाला... ) हा व्हिडीओ पुण्याच्या राहुल चित्रपटगृहामधील आहे. या चित्रपटगृहात चित्रपट पाहायला आलेल्या तरुणांनी एकत्र येत अंगावर शहारा आणणारे शिवगीत गात 'पावनखिंड'ला प्रतिसाद दिला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आज 'पावनखिंड' हा चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस झाले आहेत. परंतु आजही पहिल्या दिवसा इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त गर्दी चित्रपटगृहांत पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहाच्या बाहेर हाऊसफुलचे बोर्ड लावण्यात आले आहेत. एकूण दहा दिवसात या चित्रपटाने तब्बल 16. 71 कोटींचा गल्ला जमवला आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या