मुंबई, 12 नोव्हेंबर : यशराज फिल्म्स हा बॉलिवूडमधला मोठा ब्रँड आहे. चित्रपट निर्मिती करणारा हा स्टुडिओ आता ओटीटीवरही (YRF on OTT) येणार आहे. आदित्य चोप्रा (Aditya Chopra) हे वायआरएफच्या ओटीटी व्हेंचरसाठी (YRF OTT venture) 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. हा प्लॅटफॉर्म वायआरएफ एंटरटेन्मेंट (YRF Entertainment) म्हणून ओळखला जाणार आहे.
बॉलिवूडमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या डिजिटल कंटेंटचा (Digital content in India) स्तर उंचावण्यासाठी आदित्य चोप्रा पुढे येणार आहेत. भारतीय कथांवर बनलेले चित्रपट जागतिक स्तरावरच्या चित्रपटांप्रमाणे असावेत अशी त्यांची इच्छा आहे. या निर्णयामुळे देशातल्या ओटीटी प्लॅटफॉर्मला (OTT in India) नवी दिशा मिळणार आहे. वायआरएफकडे याबाबत मोठमोठ्या योजना आहेत आणि लवकरच याबाबत रणनीतीही ठरवण्यात येईल, असं एका सूत्रानं सांगितलं.
निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांनी यशराज स्टुडिओची स्थापना केली होती. सध्या हा स्टुडिओ हिंदी आणि पंजाबी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात अग्रगण्य आहे. ‘दाग’ हा वायआरएफचा (YRF Movies) पहिला चित्रपट. या स्टुडिओने बरेच चढउतार पाहिले आहेत. चांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, धूम फ्रँचायजी, फना, रब ने बना दी जोडी आणि एक था टायगर असे काही मोठे चित्रपट (YRF movies) यशराज बॅनरने लोकांना दिले आहेत. कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री यशराज स्टुडिओसोबत एक तरी सिनेमा करायला मिळावा यासाठी धडपडत असतात. अशात आता हा स्टुडिओ ओटीटीवर येण्याच्या तयारीत आहे.
हे ही वाचा-'डॉक्टर डॉन' दिसणार प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ सिनेमात
दोन वर्षांपासून सुरू आहे तयारी
या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आदित्य चोप्रा आणि त्यांचा स्टुडिओ गेल्या दोन वर्षांपासून याबाबत तयारी करत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही प्रोजेक्ट्सवर त्यांनी आधीच काम सुरू केलं असल्याचंही या सूत्रानं सांगितले. त्यामुळे वायआरएफचं ओटीटी आगमन एकदमच धडाक्यात होणार आहे असं दिसतंय.
“वायआरएफ जेव्हा काही नवीन करायचं ठरवतं, तेव्हा ते अगदीच भव्य असतं. आदित्य चोप्रांनी आपल्या ओटीटी व्हेंचरसाठी सुमारे 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असून, भारतीय ओटीटी क्षेत्रातली ही सर्वांत रोमांचकारी घटना असणार आहे,” असंही या सूत्रानं सांगितलं.
एकंदरीत बॉलिवूडला कित्येक हिट फिल्म्स दिलेल्या यशराज स्टुडिओची ही नवी इनिंग अत्यंत रोमांचकारी असणार आहे. आता याबाबत अधिकृत घोषणा कधी होते, याचीच सर्व जण वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.