नवी दिल्ली 11 मे: देशातील अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वेगाने वाढत आहे. अशा स्थितीत सरकार लसीकरणावर (Vaccination) भर देत आहे. परंतु, लसीचा तुटवडा आणि मागणी यात मोठी तफावत असल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे सेलिब्रेटी, राजकीय व्यक्तींना लस वेळेत मिळत असल्यानं नागरिकांचं लक्ष्य तिकडे वेधलं जात आहे. यांना एक आणि आम्हाला वेगळा न्याय का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यातच एखाद्या सेलिब्रिटीनं लस घेताना किंवा लस घेतल्याचे सोशल मीडियावर सांगितलं, की अशा व्यक्ती ट्रोल होत आहेत. नुकताच हा अनुभव बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरला (Bollywood Actor Farhan Akhtar) आला.
ज्या ठिकाणी 60 वर्षांवरील व्यक्तीसाठी लसीकरण सुरु आहे, तिथे तुम्हाला लस (Vaccine) कशी मिळाली, तुमची पोहोच असल्याने हे शक्य झाले का? असे प्रश्न ट्रोलर्सने फरहानला विचारले. देशात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व युवकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. लसीकरण सुरु झाल्यानंतर अनेक लोक लस घेण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याने शनिवारी 8 मे रोजी मुंबईतील अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये लसीचा पहिला डोस (First Jab) घेतल्याची माहिती ट्विटरव्दारे (Twitter) दिली. त्याने हे ट्विट करताच तो ट्रोल झाला.
वृत्तानुसार, अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये लसीकरण अभियान हे केवळ 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी सुरु करण्यात आले आहे. फरहान अख्तरचं वय 47 वर्ष आहे. असं असतानाही त्यानं याठिकाणी लस कशी घेतली, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत. फरहान अख्तर यानी आपल्या ओळखीचा फायदा घेत स्वतःसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे नियोजन केलं, असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर याची चर्चा रंगल्यानंतर यावर फरहाननं उत्तर दिलं आहे.
फरहान अख्तरने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलं, की येथे 45 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण अभियान सुरु आहे. तुमच्याकडे जो वेळ आहे तो सामाजिक कामांसाठी वापरावा. लसीकरणानंतर फरहानने ट्विट केलं होतं, की अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये (Andheri Sport Complex) लसीकरण अभियानाच्या माध्यमातून मला आज लसीचा पहिला डोस मिळाला. बीएमसी आणि मुंबई पोलीस यंत्रणेने जी व्यवस्था येथे उभारली आहे, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. लसीसाठी आपला नंबर येण्याकरता नागरिकांना येथे 2 ते 3 तास वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी धीर धरावा. गरज वाटत असेल तर नागरिकांनी लसीकरणासाठी जाताना पाणी आणि नाष्टा सोबत घेऊन जावा आणि सुरक्षित राहावे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.