मुंबई, 09 जानेवारी: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजन सृष्टीत खळबळ माजली आहे. अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तुनिषा शर्मा ‘अलीबाबा:दास्तान-ए-काबुल’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकत होती. मात्र अचानक अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच फाशी घेत आत्महत्या केली होती. त्यांनंतर अभिनेत्रीच्या आईने आपल्या मुलीची फसवणूक करुन तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तुनिषाचा सहकलाकार आणि बॉयफ्रेंड शिजान खानवर केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणात तुनिषा शर्मा आणि शिजान खानच्या कुटुंबाकडून दररोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. अशातच आता तुनिषाच्या आईने शीझानवर ‘तुनिषाची हत्याच आहे’ असा एक नवा आरोप केला आहे. तुनिषाने गळफास लावल्याचं कळालं तेव्हा ती श्वास घेत होती आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेले असते तर तिला वाचवता आलं असतं, असा आरोप तिच्या आईने केला आहे. दिवंगत अभिनेत्री तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी माध्यमांशी संवाद साधला. हेही वाचा - Avaneet Kaur: तुनीषाची जागा घेणार नाही अवनीत कौर; समोर आलं मोठं कारण त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘‘ही आत्महत्या किंवा खून असू शकतो. मी हे म्हणतेय, कारण शिझान तिला दूरच्या एका रुग्णालयात घेऊन गेला होता. सेटपासून ५ मिनिटांच्या अंतरावर हॉस्पिटल्स होती. तिला जवळ का घेऊन गेला नाही? ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, तेव्हा श्वास घेत होती, जिवंत होती आणि तिला वाचवता आलं असतं’’ असं वनिता शर्मा एएनआयशी बोलताना म्हणाल्या. त्याचवेळी तुनिषासोबत आपेल संबंध चांगले असल्याचंही वनिता शर्मा यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी तुनिषाचा एक व्हॉईस मेसेजही दाखवला.’ शीझानसोबत ब्रेकअप झाल्याच्या अवघ्या 15 दिवसांतच, म्हणजेच 24 डिसेंबर रोजी तुनिषानं सेटवर आत्महत्या केली होती. याच प्रकरणी तुनिषाचा सहकलाकार आणि मित्र शीझान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. शीझान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. शीझान आणि तुनिषा यांच्या कुटुंबीयांकडून माध्यमांसमोर दररोज नवनवे खुलासे केले जात आहेत. तसेच, एकमेकांवर आरोपही केले जात आहेत.
शिझान खानच्या कुटुंबीयांनी दावा केला होता की वनिता आपल्या मुलीच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवत होत्या आणि तिला पैसे देत नव्हत्या. तसेच तुनिषाचे आईबरोबर चांगले संबंध नव्हते, हा दावा त्यांनी फेटाळला आहे. ‘‘आमचं नातं खूप चांगलं होतं. शिझानच्या आईने मला माझ्या मुलीबरोबरच्या नात्याबद्दल सांगण्याची गरज नाही’’ असं त्या म्हणाल्या. आता हे प्रकरण पुढे नक्की कोणतं वळण घेतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.