मुंबई, 04 जानेवारी: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अभिनेत्रीची आई वनिता शर्मा यांनी शीझान खानवर गंभीर आरोप केले होते, याला प्रत्युत्तर म्हणून शीझानच्या बहिणी आणि आईने पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली. मात्र त्याचवेळी त्यांनी तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले. तसेच, शीझानच्या वकिलाने तुनिषाच्या आईने एकदा अभिनेत्रीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला एवढेच नाही तर तिने तिला पैसेही दिले नाहीत असा खळबळजनक दावा केला होता. आता त्यानंतर तुनिषाची मैत्रिण आणि माजी को-स्टार सोनिया सिंगने धक्कादायक खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी तुनिषाच्या आई आणि मामाने पत्रकार परिषदेत शीझानवर आणखी अनेक आरोप केले होते, ज्याला आरोपीच्या बहिणी आणि आईने पत्रकार परिषदेत उत्तरे दिली. शीजानच्या बहिणी आणि वकिलाने दावा केला होता की, तुनिषाची आई तिच्या मुलीच्या पैशांवर नियंत्रण ठेवत असे आणि अभिनेत्रीकडे नेहमीच पैशांची कमतरता असते. आता तुनिषाची मैत्रिण सोनिया हिनेही असाच दावा केला आहे. हेही वाचा - Tunisha Sharma: तुनिषाचा मामाच तिचा सावत्र पिता? संजीव कौशलने सांगितलं सत्य सोनिया सिंह म्हणाली, ‘तुनिषा जेव्हाही मोकळी असायची तेव्हा मला फोन करायची. गेल्या काही दिवसांपासून ती खूप अस्वस्थ होती आणि डिसेंबरमध्ये आम्ही फार कमी बोललो. 14 डिसेंबरला आम्ही भेटलो तेव्हा तुनिषा म्हणाली की शीजानने तिला काही जागा हवी असल्याचे सांगितले. तुनिषा म्हणाली होती की, शीजानला हे अजिबात आवडत नाही की मी तिच्याशी सतत प्रेमाबद्दल बोलत असते. मग मी तुनिषाला समजावलं की रिलेशनशिपमध्ये अशा गोष्टी घडतात. सोनिया सिंह पुढे म्हणाली, ‘तुनिषाला अनेकदा पैशांची कमतरता होती. नुकतेच मृत्यूपूर्वी तिने माझ्याकडे 3,000 रुपये मागितले होते. मी तिला त्याबद्दल विचारले असता तिने ‘तिच्याकडे पैसे नाहीत’ असे सांगितले होते. सोनिया सिंहने असाही दावा केला की तुनिषा शर्माने तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी 23 डिसेंबरला फोन केला होता आणि सांगितले होते की, ‘जर मम्मीचा फोन आला तर मी त्यांना तुनिषा माझ्यासोबत आहे’ असं सांगावं. सोनियाच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर तुनिशाने तिला तिच्या आईशी खोटे बोलण्यास का सांगितले हे तिला समजले नाही.
सोनिया सिंगने असेही उघड केले की, तुनिषाने शीझान खानच्या कुटुंबाला आपले मानले होते. ती शीजानच्या आईला अम्मी आणि बहिणींना अप्पी म्हणायची. सोनियाच्या म्हणण्यानुसार, तिला हे अगदी सामान्य वाटले कारण ती ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती त्याच्या कुटुंबाला ती स्वतःची समजत होती. त्याचवेळी शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी अभिनेत्याला जामीन मिळावा यासाठी मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. शीझान खान आणि तुनिषा शर्मा यांचे एकमेकांवर प्रेम होते. पण रिपोर्ट्सनुसार, तुनिषाच्या आत्महत्येच्या १५ दिवस आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते.