मुंबई, 22 एप्रिल: ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gat Ahe) या स्टार प्रवाहवर लवकरच येणाऱ्या मालिकेतील पात्रांचा आता उलगडा होऊ लागला आहे. ही मालिका 2 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare New Serial) दिसणार आहे. या मालिकेचे काही प्रोमो समोर आले आहेत. ज्यातून हे लक्षात येते की अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare Upcoming Serial on Star Pravah) या मालिकेतील चिमुरडी स्वरा हिच्या आईच्या भूमिकेत आहे. या दोघींच्या भोवती असणारं या मालिकेचं कथानक आहे. मात्र गोड गळ्याच्या या चिमुरड्या स्वराला तिचे बाबा कोण असतात या प्रश्नाचे उत्तर माहीत नसते. स्वराची भूमिका अन्वी तायवडे (Avni Taywade) ही बालकलाकार साकारत आहे. आता आणखी एका पात्राचा उलगडा झाला आहे. या पात्राचे नाव आहे ‘मल्हार कामत’. रॉकस्टार दाखवण्यात आलेल्या मल्हारची एंट्रीही धमाकेदार झाली आहे. स्टार प्रवाहच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मल्हारच्या एंट्रीचा खास प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यानंतर आता या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारेसह मुख्य भूमिकेत कोण असणार हे स्पष्ट झाले आहे. हे वाचा- अरुंधती-अनिरुद्धमध्ये पुन्हा होतंय सर्वकाही सुरळीत, काय असणार मालिकेतील नवा ट्विस्ट? ‘उडून ये फुलपाखरा… उडून ये माझ्या घरा… कशी वाटली मल्हार कामतची एंट्री…?’ अशी कॅप्शन देत मल्हार कामतच्या एंट्रीचं एक गाणं शेअर करण्यात आलं आहे. त्यातून उलगडा होतो आहे की या मालिकेत मुख्य भूमिकेत कोण कलाकार आहे. छोट्या पडद्यावर ‘गुरुनाथ’ म्हणून प्रसिद्ध असणारा अभिजीत खांडकेकर हा अभिनेता ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार आहे. या मालिकेत एका प्रसिद्ध गायक मल्हार कामतच्या भूमिकेत अभिजीत दिसणार आहे. अभिजीतने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर या प्रोमोची पोस्ट शेअर केली आहे. त्यावर त्याच्या सहकलाकारांच्या कमेंट्सचा पाऊस पडला आहे. त्याच्या नवीन इनिंगसाठी सर्वजण त्याला शुभेच्छा देत आहेत.
स्टार प्लसवरील ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या मालिकेचा ‘तुझेच मी गीत गात आहे’ हा मराठी रिमेक असणार आहे. मुळात ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ हा शो बंगाली मालिकेचा रिमेक होता. त्याचा हिंदी रिमेकला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मराठी रिमेक स्टार प्रवाह घेऊन येत आहे. अभिनेता अभिजीत खांडकेकर याने मराठीतील अनेक प्रसिद्ध प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. आरजे ते अभिनेता असा त्याचा प्रवास सर्वश्रृत आहे. त्याच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील भूमिकेने त्याला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवलं. या मालिकेने टीआरपीमध्ये देखील अनेकदा बाजी मारली होती. आता अभिजीतची नवी भूमिका त्याच्या चाहत्यांना किती पसंतीस उतरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.