मुंबई 25 जुलै: तू तेव्हा तशी मालिकेत येत्या (tu tevha tashi marathi serial latest news) काळात एक धमाकेदार ट्विस्ट दिसून येणार आहे. इतके दिवस चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते असे आनंदाचे क्षण मालिकेत दिसून येणार आहेत. या मालिकेत फुलणारं सौरभ आणि अनामिकाचं प्रेम एक वेगळं वळण घेताना दिसणार आहे. मालिकेमध्ये एका खास गाण्याने या सुखाच्या क्षणांची नांदी होताना दिसणार आहे. जावा-जावांमध्ये रंगणारं हे खास गाणं असणार आहे. यामध्ये वल्ली आणि अनामिका एका धमाल अंदाजात समोर येणार आहेत. एका न्यूज पोर्टलशी बोलताना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांनी याबद्दल माहिती दिली. ते दोघेही असं सांगतात, “हे पट्या आणि त्याच्या अख्ख्या कुटुंबासोबत रंगणारं धमाल गाणं असणार आहे. यानिमित्ताने सगळ्या प्रेक्षकांनी अनुभवलेले ताण तणावाचे क्षण विसरून एक आनंदाचं वातावरण आणि धमाल घेऊन येण्याचा हा प्रयत्न असणार आहे. हे वल्ली आणि अनामिकामध्ये रंगणार गाणं आहे. पण यात सगळ्यांचाच सहभाग असेल. मालिकेत गेले अनेक दिवस फार वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी घडत होत्या. त्यातून बाहेर येऊन रिफ्रेश होणारं हे गाणं असेल. तसंच मालिकेत येत्या काळात अनेक अनपेक्षित गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे. त्याची ही नांदी आहे किंवा एक झलक आहे असं म्हणता येईल. यासाठी सगळ्यांचा अंदाज सुद्धा एकदम झकास आहे. यासाठी सगळीच टीम अत्यंत जोमाने काम करत आहे. प्रत्येकजण हौशीने सहभागी होत आहे. मालिकेत येणारा हा ट्विस्ट नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना आवडेल.”
मालिकेत सौरभ आणि अनामिकाच्या प्रेमाचा स्वीकार हळूहळू कुटुंबियांकडून होताना दिसत आहे. सौरभ आणि अनामिका यांच्या प्रेमाने अनेक संकटं झेलली आहेत. पण तरीही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नसल्याचं दिसून आलं आहे. सध्या वल्लीसमीर सचिनचं सत्य आलं असून ती त्यावर बरीच रिऍक्ट होताना दिसून आली होती. मालिकेने नुकतेच शंभर एपिसोड सुद्धा पूर्ण केल्याचं दिसून येत आहे. या निमित्ताने मालिकेच्या टीमने सेलिब्रेशन सुद्धा केलं होतं.