मुंबई, 29 डिसेंबर : सर्वसामान्य गृहिणीची कथा असलेल्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात बाजी मारली. या मालिकेतील अश्विनीला महिला प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करते. यासाठी तिला नवऱ्याची साथ मिळत नसली तरी तिची मुलगी मयुरी कायम तिच्यासोबत असते. आई आणि मुलीच्या या मैत्रीच्या नात्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता या मालिकेतील अश्विनीची लेक मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेत अश्विनीच्या मोठ्या मुलीची म्हणजेच मयुरी वाघमारेची भूमिका अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिने साकारली आहे. वैष्णवी आजपर्यंत विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली आहे. अल्पावधितच वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे केले. तिचा गोड चेहरा आणि निरागस अभिनय प्रेक्षकांना भावतो. आता वैष्णवी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: ‘माझं तुझ्यावर प्रेम….’ अखेर आशुतोष अरुंधतीला करणार प्रपोज; काय असेल तिचं उत्तर? नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही ‘झुळूक’ तरुणांना भावणारी आहे. आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल वैष्णवी कल्याणकर म्हणते, ’’ मोठ्या पडद्यावर मी पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळे आनंदी, उत्साही, थोडीशी धाकधूक अशा विविध भावना सध्या मी अनुभवतेय. यात मी ‘झुळूक’ची व्यक्तिरेखा साकारतेय, जी खूपच सोज्वळ, निरागस आहे. तरुणींना ही व्यक्तिरेखा आपल्या खूप जवळची वाटेल. जणू काही ही आपल्याच घरातली आहे, असे वाटेल. एका मालिकेदरम्यान मी ‘बांबू’मधील ‘झुळूक’साठी ऑडिशन दिले होते. माझी निवड झाली आणि प्रॉडक्शनकडून मला एकदा सकाळी सात वाजता पुण्याला बोलवले. आमची ही मीटिंग सुमारे पाच तास चालू होती. त्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरु झाली. आता लवकरच ‘झुळूक’ तुम्हाला भेटायला येणार आहे.’’
क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. तर या चित्रपटाचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बांबू’ येत्या २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वैष्णवीने याआधी ‘तू चाल पुढं’ आणि देवमाणूस या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.

)







