nमुंबई, 25 ऑगस्ट : आपल्या मधुर आवाजाने गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका (Singer) आशा भोसले (Asha Bhosale) यांचं गाण्यावर जितके प्रेम आहे तितकंच स्वयंपाक करण्यावर आणि लोकांना खाऊ घालण्यावर आहे. त्यांच्या सुगरणपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. याच खाद्यप्रेमातून त्यांनी जगभरात अनेक ठिकाणी रेस्टॉरंटची (Restaurant) साखळीच उभी केली असून, तिथं भारतीय भोजनाचे नानाविध प्रकार उपलब्ध केले जातात. आशा भोसले यांच्या स्वतःच्या काही खास रेसिपी आहेत, त्याही इथे चाखता येतात. ‘आशाज’ (Asha’S) नावाने ही रेस्टॉरंटची साखळी प्रसिद्ध आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीचा जगभरात प्रसार करण्यात आशा भोसले यांचा मोठा वाटा आहे. अनेक सेलेब्रिटीजनी त्यांच्या या रेस्टॉरंटमध्ये येऊन भारतीय भोजनाचा आस्वाद घेतला आहे.
अलीकडेच हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझ (Tom Cruise) यानंही आशा भोसले यांच्या बर्मिंगहॅममधील (Birmingham) आशाज या रेस्टॉरंटला भेट दिली आणि भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. इतकंच नव्हे तर तो या पदार्थांच्या प्रेमातच पडला. यापूर्वी एड शीरन आणि द रोलिंग स्टोन्स या कलाकारांनीही आशा भोसले यांच्या या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.
टॉम क्रूझ फेब्रुवारीपासून इथे ‘मिशन इम्पॉसिबल 7’ चं (Mission Impossible 7) शूटिंग करत आहे. यातून ब्रेक घेतल्यानंतर शनिवारी टॉम क्रूझ त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याने ‘चिकन टिक्का मसाला’ची (Chicken Tikka Masala) ऑर्डर दिली. ही डिश त्याला इतकी आवडली की त्याने परत एकदा तीच डिश मागवून मनसोक्त आनंद घेतला, अशी माहिती या रेस्टॉरंटचे महाव्यवस्थापक नौमन फारूकी (Nauman Farooqi) यांनी सोशल मीडियावर टॉम क्रूझ आणि सहकाऱ्यांच्या फोटोसह दिली आहे. या फोटोत टॉम क्रूझ, महाव्यवस्थापक नौमन फारूकी आणि इतर दोघांसोबत दिसत आहे.
आशा भोसले यांनीही टॉम क्रूझच्या भेटीबाबत ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘मला हे ऐकून खूप आनंद झाला की टॉम क्रूझ यांनी आशा (बर्मिंगहॅम) इथे जेवणाचा आनंद घेतला. मला आशा आहे की ते लवकरच आमच्या रेस्टॉरंटला पुन्हा भेट देतील.’ असं त्यांनी या मेसेजमध्ये म्हटलं आहे.
It was an absolute pleasure to welcome Tom Cruise to Asha's Birmingham yesterday evening 🌟
Tom ordered our famous Chicken Tikka Masala and enjoyed it so much that as soon as he had finished, he ordered it all over again - The greatest compliment 😋 pic.twitter.com/gemd7QJUEg — Asha's (@Ashas_UK) August 22, 2021
फारुकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संध्याकाळी 6 वाजता टॉम क्रूझ इथं आले. त्यांनी सांगितले की, त्यांना भारतीय जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. त्यांना गर्दी नको आहे. इतर लोकांसारखंच इथे जेवण करायचं आहे. त्याने चिकन टिक्का मसाला ही डिश अधिक मसाल्यांसह सर्व्ह करण्यास सांगितली. ती डिश त्याला आवडली. त्याने पुन्हा एकदा ती डिश ऑर्डर केली. आणखीही काही पदार्थांचा त्याने आस्वाद घेतला. हे सर्व पदार्थ आवडल्याचं त्याने सांगितलं. जेवण झाल्यानंतर बाहेर पडताना त्यानं सोशल डिस्टन्सिंग राखून फोटो घेण्यास परवानगी दिली. रेस्टॉरंटच्या बाहेर हे फोटो काढण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asha bhosle, Tom cruise