मुंबई 21 मार्च**:** उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी महिलांनी फाटक्या जीन्स घालण्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. “या महिला फाटके कपडे घालून का फिरतात? हे कसले संस्कार?” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर दाक्षिणात्य अभिनेते सत्यराज यांची मुलगी दिव्या सत्यराज संतापली आहे. “आता तर मी रोज फाटलेलेच कपडे घालणार. तुम्हाला जे करायचं ते करा.” असा टोला तिनं मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. बाहुबली या चित्रपटात कट्टपाची भूमिका साकारणाऱ्या सत्यराज यांची मुलगी दिव्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोक मतं मांडते. यावेळी तिनं तीरथ सिंह रावत यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. “आता तर मी फाटलेल्या जीन्सच घालणार. तुम्ही आम्हाला शिकवू नये काय घालायचं अन् काय घालू नये. काय योग्य अन् काय अयोग्य हे आम्हाला देखील कळतं.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून तिनं मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सोबतच तिनं फाटलेली जीन्स घालून काढलेले काही फोटो देखील शेअर केले आहेत. अवश्य पाहा - फाटलेल्या जीन्सवरुन स्वरा भास्करनं घेतली RSSची फिरकी; म्हणाली…
काय म्हणाले होते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत? एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं होतं. “आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,” असं रावत यांनी म्हटलं. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केलं.