मुंबई,1 एप्रिल- बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनी 70-80 च्या दशकात आपल्या अभिनयानेच नव्हे तर सौंदर्यानेसुद्धा लोकांना घायाळ केलं आहे. आजही त्यांचं सौंदर्य तरुणींना लाजवेल असं आहे. त्यामुळेच त्यांना इंडस्ट्रीतील 'ड्रीम गर्ल' म्हणून ओळखलं जातं. हेमामालिनी यांनी 1968 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'सपनो का सौदागर' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या चित्रपटापासून त्यांची सिने कारकीर्द सुरु झाली होती. यानंतर त्यांनी 'सीता और गीता', 'शोले', 'सत्ते पे सत्ता', 'धर्मात्मा', 'बागवान', 'वीर जारा'अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतच त्या आपल्या खाजगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असतात.
या वयातही हेमामालिनी लाखो लोकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. इतकंच नव्हे तर त्याकाळात अनेक अभिनेते त्यांच्या प्रेमात होते. अनेकांसोबत त्यांच्या लग्नाच्या बातम्याही समोर यायच्या, मात्र हेमामालिनी नेहमीच आधीच विवाहित असलेल्या धर्मेंद्र यांच्या प्रेमात होत्या. अनेकांची मनं तोडत त्यांनी अभिनेते धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करत संसार थाटला होता. हेमामालिनींचं 1980 मध्ये धर्मेंद्र यांच्याशी लग्न झालं होतं.
(हे वाचा: 'हा' स्पर्धक बनला MasterChef India 7 चा विजेता; बक्षीसात मिळालं काय-काय? रकमेचा करणार असा वापर)
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. पण, धर्मेंद्र यांचं हे दुसरं लग्न होतं. हेमाशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचं प्रकाश कौर यांच्याशी लग्न झालं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना सनी देओल आणि बॉबी देओल ही दोन मुले आणि विजिता देओल आणि अजिता देओल या दोन मुली होत्या. सनी, बॉबी आणि ईशा यांनीसुद्धा वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. तर अहानाचं करिअर फ्लॉप ठरलं. इतर दोन्ही मुलींनी लाइमलाईटपासून दूर राहणं पसंत केलं.
हेमा मालिनी यांच्यावर आधारित पुस्तकसुद्धा फारच चर्चेत आलं होतं.या पुस्तकाचं नाव आहे 'हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल'. यामध्ये राम कमल मुखर्जी यांनी अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले आहेत. यापैकी एक हेमाच्या पहिल्या गर्भधारणेशी संबंधित आहे. राम कमल मुखर्जी यांच्याशी झालेल्या संभाषणात हेमा यांनी स्वतः पहिल्यांदा गरोदर असताना घडलेली एक घटना सांगितली होती. हेमा पहिल्यांदा गरोदर असताना सासू सतवंत कौर कोणालाही न सांगता त्यांना भेटण्यासाठी डबिंग स्टुडिओत गेल्या होत्या.
याबाबत सांगताना हेमा मालिनी म्हणाल्या- 'धर्मेंद्र यांच्या आई सतवंत कौर खूप दयाळू आणि प्रेमळ होत्या. मला चांगलं आठवतं की, मी ईशावेळी गरोदर होते आणि त्यांना माझ्या गरोदरपणाबद्दल समजलं तेव्हा त्या जुहू येथील डबिंग स्टुडिओमध्ये मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी घरातील कोणालाही याबाबत सांगितलं नव्हतं. त्या पोहोचताच मी त्यांच्या पायाला स्पर्श केला. त्यांनी लगबगीने मला मिठी मारली आणि म्हटलं, 'बाळा, नेहमी आनंदी राहा.' त्या माझ्याबाबतीत आनंदी होत्या याचा मला आनंद झाला होता'.असंही हेमा यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Dharmendra deol, Entertainment