मुंबई, 3 फेब्रुवारी- 'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी लोकांना हसवणाऱ्या कॉमेडियन सिद्धार्थ सागरचं वैयक्तिक आयुष्य अजिबात चांगलं नव्हतं. त्याला खूप त्रास सहन करावा लागला. कॉमेडियन असण्याबरोबरच सिद्धार्थ हा एक चांगला मिमिक्री आर्टिस्ट आणि अभिनेतादेखील आहे. 2009मध्ये 'कॉमेडी सर्कस'द्वारे त्याने स्टँडअप कॉमेडियन म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या शोच्या अनेक सीझनमध्ये तो दिसला होता. 2014मध्ये, त्याने 'प्रीतम प्यारे और वो' या हॉरर कॉमेडी शोमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केलं होतं. यानंतर तो अनेक शोजमध्ये दिसला; पण हळूहळू तो टीव्ही इंडस्ट्रीतून गायब होत गेला. 2017मध्ये तो इंडस्ट्रीतून बेपत्ता असल्याची बातमी आली होती. त्यानंतर मार्च 2018मध्ये सिद्धार्थ सागर लोकांसमोर आला. एक पत्रकार परिषद घेऊन त्याने धक्कादायक खुलासा केला. त्याने सांगितले की त्याची आई आणि त्याच्या आईचा प्रियकर सुयश गाडगीळ त्याला असं औषध देत होते, ज्यामुळे त्याला बायपोलर डिसऑर्डर होईल. या औषधांमुळे तो डिप्रेशनमध्येही गेला होता.
सिद्धार्थ सागरने सांगितलं होतं, की त्याला ड्रग्जमिश्रित अन्न देण्यात येत होतं. यामुळे त्याला ड्रग्जची सवय लागली. त्यानंतर त्याच्या आईने मुद्दाम त्याला मुंबईतल्या एका रिहॅब सेंटरमध्ये दाखल केलं आणि जेव्हा तो तिथे गेला तेव्हा परिस्थितीने आणखी वाईट झाली. कारण नंतर तो मालमत्तेच्या वादात अडकला. इतकंच नव्हे तर सिद्धार्थच्या आईने बॉयफ्रेंडसह मिळून त्याचा बंगला 80 लाख रुपयांना विकला आणि सुयशने त्याला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर 4-5 जणांनी त्याला एवढी मारहाण केली, की तो बेशुद्ध झाला; मात्र त्याच्या मॅनेजरने त्याला तिथून बाहेर काढलं.
"4 वर्षं खूप कठीण गेली होती. 2012 साली मी मनोरंजन क्षेत्रात आलो. त्याआधी मी आध्यात्मिक झालो होतो. माझ्या गुरूंनी मला प्रेरित केलं आणि मग मी कॉमेडी क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत आलो. माझं कुटुंब माझ्या गुरुजींच्या विरोधात होतं. गुरुजींनी समाधी घेतल्यावर मी तुटलो. मी ध्यान करणं थांबवलं. माझ्या पालकांनी मला न सांगता बायपोलर डिसॉर्डरची औषधं मला देण्यास सुरुवात केली होती," असं सिद्धार्थने पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
सिद्धार्थ सागर पुढे म्हणाला, "माझी आई सिंगल पॅरेंट होती. ती माझी चांगली मैत्रीण होती. ती सुयश गाडगीळला भेटली आणि माझ्या आईला तिचा आधार मिळाला याचा मला आनंद झाला; पण त्यानंतर ती विचित्र वागू लागली. जेव्हा जेव्हा मी तिला हिशेब विचारायचो, तेव्हा तिला वाईट वाटायचं. एके दिवशी तर सुयशने मला घर सोडायला सांगितलं. त्यानंतर मी गाडीत झोपू लागलो होतो."
सिद्धार्थ सागर म्हणाला, "माझ्या आईने मला रिहॅब सेंटरमध्ये पाठवले आणि मी दोन महिन्यांनी परत आलो, तेव्हा माझी आई माझ्याकडे संशयास्पद नजरेने पाहायची. तिची वागणूक खूप दुखावणारी होती. तिला मला पुन्हा व्यसनी बनवायचं होतं." काही वर्षांनी सिद्धार्थने आई-वडिलांशी असलेले वाद सोडवले. तो आता त्याच्या आईसोबत राहतो आणि ती आपली सपोर्ट सिस्टीम असल्याचं म्हणतो. त्याने कपिल शर्मा शोच्या माध्यमातून टीव्हीवर पुनरागमन केलं आणि तो प्रेक्षकांना हसवतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.