मुंबई 07 ऑगस्ट: बहुचर्चित कार्यक्रम तारक मेहता का उलटा चश्मा सध्या अनेक कारणांनी चर्चेत येताना दिसत आहे. मालिकेने चौदा वर्षांचा टप्पा पूर्ण केला असला तरी मालिकेतील एक एक कलाकार मालिकेला रामराम ठोकताना दिसत आहेत. कार्यक्रमातून तारक मेहतांचं काम करणाऱ्या शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर त्यावर मालिकेचे (TMKOC producer Asitkmar Modi) निर्माते असितकुमार मोदी यांनी प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे. अनेक बातम्यांमध्ये असं सांगण्यात येत होतं की शैलेश यांना परत आणायचे प्रयत्न सुरु आहेत. तेवढ्यातच शैलेश यांच्या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो झळकू लागला. मात्र मालिकेच्या मेकर्सकडून कसलीच माहिती समोर येत नव्हती. आता असितकुमार या सगळ्या प्रकारावर व्यक्त झाले आहेत. आणि त्यांचं हे वक्तव्य हैराण करणारं आहे. एका फॅन पेजशी बोलताना असितकुमार मोदींनी असं सांगितलं की, “हे बघा, आधीपासूनच सगळ्यांना एकत्र जोडून ठेवण्याचा माझा मानस राहिला आहे. पण जर काहीजण सोबत येऊ इच्छित नाहीत, त्यांचं पोट जर भरलं असेल, त्यांना असं वाटतंय की आपण खूप काही केलंय आणि अजून बरंच काही केलं पाहिजे, ते तारक मेहता शोपर्यंत सीमित राहू इच्छित नाहीत, त्यांना समजून घ्यायचं नसेल तर मी त्यांना पुन्हा सांगू इच्छितो की नीट विचार करा-समजून घ्या. पण तरीही जर त्यांची इच्छा नसेल तर शो कोणासाठी थांबणार नाही.” नवीन तारक मेहताच्या कास्टिंगबद्दल ते असं सांगतात, “नवे तारक मेहता नक्कीच शोमध्ये येतील, जुने तारक परत आले तरी आम्हाला आनंद आहे आणि नाही आले तरी आम्ही थांबून राहणार नाही. नवीन तारक मेहता आले तरी आनंदच आहे. माझं लक्ष्य फक्त एकच आहे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील हसू कायम ठेवणं ते मी करत राहीन.” हे ही वाचा- Uorfi Javed & Chahatt Khanna: उर्फीच्या कपड्यांवर अभिनेत्रीची वादग्रस्त कमेंट; सोशल मीडियावर नवा वाद तारक मेहता कार्यक्रमात जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक कलाकाराला कॉन्ट्रॅक्टमध्ये अशी अट घातली जाते की या शो व्यतिरिक्त ते इतर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत, अशी माहिती सांगितली जाते. यामुळे अनेक कलाकारांकडे त्यांचं शूटिंग झाल्यावर वेळ असतानाही त्यांना इतर काम करता येत नाही. असं सांगितलं जातं की शैलेश यांनी तारक मेहताच्या शूटिंग व्यतिरिक्त त्यांच्या नव्या कार्यक्रमात काम करायची परमिशन मेकर्सकडे मागितली होती.
पण अशाने कॉन्ट्रॅक्ट बदलावं लागेल म्हणून त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि त्यांनी कार्यक्रम सोडला असं सांगितलं जात आहे. सध्या टप्पूचं काम करणाऱ्या राज अनादकटने सुद्धा कार्यक्रम सोडल्याच्या बातम्या जोर धरत आहेत. राज अनेकदिवस मालिकेतून गायबसुद्धा आहे.