मुंबई,15 फेब्रुवारी- ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टीव्ही सीरिअल गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यातील कलाकारांच्या भन्नाट विनोदी अभिनयामुळे त्यांना घराघरात लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून चुकीच्या कारणांमुळे ही मालिका चर्चेत आहे. अनेक कलाकारांनी या मालिकेत काम करणं सोडलं असून, नवीन कलाकार त्यांची जागा घेत आहेत. या दरम्यान, प्रेक्षक अजूनही ‘दयाबेन’ म्हणजेच दिशा वाकानीच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. काही महिन्यांपूर्वी, निर्मात्यांनी एका प्रोमोमध्ये दयाबेनच्या पुनरागमनाची झलकही दाखवली होती. त्यामुळे प्रेक्षक उत्साहित झाले होते. अभिनेत्री दिशा वाकानी पुन्हा दयाबेनची भूमिका करणार की नाही याबाबत आता निर्माते असित मोदींनी मौन सोडलं आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा सीरीयलमध्ये नुकतीच नवीन ‘टप्पू’ची एंट्री दाखवण्यात आली आहे. राज अनाडकट ही व्यक्तिरेखा साकारत होता. आता त्याची जागा नितीश भुलानीनं घेतली आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत निर्माते असित कुमार मोदी यांनी सगळ्यांना नवीन टप्पूची ओळख करून दिली. त्याचवेळी त्यांनी ‘दयाबेन’बद्दलही माहिती दिली. असित मोदी म्हणाले, “दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी परत येईल की नाही याचं उत्तर देणं थोडं कठीण आहे. दिशानं परत यावं ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मी देवाला एवढीच प्रार्थना करतो की ती या शोमध्ये परत यावी. मात्र, तिला आता कौटुंबिक जीवन आहे आणि ती तिच्या कुटुंबाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे दिशाचं परत येणं थोडं कठीण वाटत आहे. पण, आता नवीन टप्पू आल्यानं नवीन दया भाभीही लवकरच येईल. गोकुळधाम सोसायटीत दया भाभीचा तोच गरबा आणि दांडिया पुन्हा बघायला मिळेल. फक्त त्यासाठी थोडी वाट बघावी लागेल.” (हे वाचा: Taarak Mehta सोडून शैलेश लोढांनी घेतला संन्यास? डोळे मिटून भक्तीत तल्लीन दिसला अभिनेता ) असित मोदी पुढे म्हणाले की, दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी कलाकार शोधणं अवघड काम आहे. आम्हाला रोजचे एपिसोड बनवावे लागतात. त्यामुळे वेळ काढणं थोडं अवघड होत आहे. त्यामुळे दयाबेनच्या पुनरागमनालाही उशीर होत आहे. मी प्रेक्षकांची इच्छा समजू शकतो. त्यांना दयाबेनची आठवण येत आहे. मला आणि माझ्या कुटुंबालाही तिची उणीव भासते. पण, आता लवकरच दयाबेन पुन्हा दिसणार आहे. दिशा वाकानीनं का सोडली होती मालिका? दिशा वकानीनं 2017 मध्ये ‘तारक मेहता’ शो सोडला होता. तेव्हा प्रसूती रजेवर गेली होती. पण, मुलाला जन्म दिल्यानंतरही दिशा अद्याप शोमध्ये परतलेली नाही. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाला शोमध्ये परत यायचं होतं. पण, तिचा पती मयूर आणि शोच्या निर्मात्यामध्ये गैरसमज झाल्यामुळे ती परत येऊ शकली नाही. असा दावा करण्यात आला आहे की, लग्नानंतर दिशाच्या करिअरचे निर्णय तिचा पती मयूर घेत आहे. दिशाच्या वतीनं त्यानेच निर्मात्यांशी बोलण्यास सुरुवात केली आहे. दिशाच्या पतीनं, असित मोदी यांच्याकडे आपल्या पत्नीचे काही पैसे बाकी असल्याचं सांगितलं होतं. सेटलमेंट पूर्ण झाल्यानंतरच ती शोमध्ये परतणार आहे. इतकंच नाही तर, दिशा महिन्यातील केवळ 15 दिवस आणि दररोज केवळ चार तास काम करणार असल्याची अटही मयूरनं घातली होती.
प्रेक्षक नाराज ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका 2008 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून दिशा या मालिकेत दयाबेनची व्यक्तिरेखा साकारत होती. दिशा आणि जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. दिशानं मालिका सोडून सहा वर्षं झाली आहेत. तरीदेखील चाहते तिच्या परतण्याची वाट पाहत आहेत. अनेकवेळा चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी निर्मात्यांवर आपला रागही व्यक्त केला आहे.