मुंबई, 14 मे- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो आहे. हा शो सध्या विविध कारणांनी वादात सापडला आहे. मात्र चाहते या मालिकेतील कलाकारांवर अफाट प्रेम करतात. त्यामुळेच त्यांच्याबाबत छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आज आपण या मालिकेतील जेठालाल गडा अर्थातच अभिनेता दिलीप जोशीं च्या आयुष्याबाबत काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. दिलीप जोशींनी आपल्या मजेशीर अभिनयाने आणि कॉमेडी टायमिंगने सर्वानांच वेड लावलं आहे. परंतु दिलीप जोशींना हे यश सहजासहजी मिळालेलं नाहीय. त्यासाठी त्यांनी बराच काळ संघर्ष केला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मुख्य अभिनेते दिलीप जोशी आज प्रत्येक घराघरात ओळखले जातात. जेठालाल गडा या व्यक्तिरेखेतून त्यांनी प्रचंड नाव कमावलं आहे. अनेकांना माहिती असेल की, दिलीप जोशी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करण्यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.सलमान खान-माधुरी दीक्षितच्या सुपरहिट ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर आता आपल्याकडे कामाची कमतरता भासणार नाही, असं त्यांना वाटलं होतं.पण असं झालं नाही, यानंतर त्यांना बराच काळ कामाची कोणतीही ऑफर मिळाली नव्हती. (हे वाचा: TMKOC: ‘तारक मेहता’फेम अभिनेत्रीच्या कॉल रेकॉर्डिंगने खळबळ; समोर आलं पडद्यामागील भयानक वास्तव ) नुकतंच दिलीप जोशी यांनी ‘द बॉम्बे जर्नी’ला दिलेल्या एका मुलाखतीत महत्वाचा खुलासा केला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, जेव्हा मला ‘हम आपके है कौन’ची ऑफर मिळाली होती तेव्हा मला पैशांची प्रचंड गरज होती. ते पुढे म्हणाले, “1992 साली माझी मुलगी नियतीचा जन्म झाला. त्यावेळी माझ्या बँक खात्यात फक्त 25 हजार रुपये होते. त्यापैकी 13-14 हजार रुपये हॉस्पिटलचं बिल भागविण्यात गेले. मी त्यावेळी एकच नाटक करत होतो. ज्याच्या एका शोमधून मला 400 ते 450 रुपये मिळायचे.असा खुलासा दिलीप जोशींनी केला आहे. दिलीप जोशी यांनी पुढे सांगितलं की, “त्यावेळी मला हम आपके है कौन हा चित्रपट मिळाला होता. मला वाटलं आता माझं आयुष्य सेट झालं आहे. पण असं अजिबात झालं नाही. तो चित्रपट आला आणि सुपरहिट झाला आणि त्यानंतरही मला काम मिळालं नाही. बऱ्याच वर्षांनंतर मला शाहरुखसोबत ‘1 टु का 4’मध्ये काम मिळालं होतं. तोपर्यंत कमासाठी वणवण सुरुच होती’.
दिलीप जोशी म्हणाले की, सलमान खान त्यांच्या प्रतिमेचा आदर करायचा. ‘मैने प्यार किया’च्या सेटवर जेव्हा सलमानला कळालं की, मी थियेटर केलं आहे. तेव्हा तो मला विचारायचा की हा शॉट ठीक आहे का? की, अजून चांगला करता आला असता. दिलीप म्हणाले, “मैने प्यार किया हा माझा पहिला चित्रपट होता. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे आणि रीमा लागूसारख्या दिग्गज लोकांची भूमिका होती, माझी खूप छोटी भूमिका होती. मी बहुतेक वेळा बाजूला बसायचो.” या सर्व संघर्षानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या माध्यमातून दिलीप जोशींना यशाची चव चाखता आली. या शोमुळे त्यांना मोठं स्टारडम मिळालं आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्यांना लोकप्रियता मिळाली आहे.