मुंबई, 14 जून : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही मालिकांसह बॉक्स ऑफिसवर आपल्या अभिनयाच्या जोरावर मोहोर उमटवणाऱ्या सुशांतने अचानक घेतलेली एक्झिट अनेकांना चटका लावणारी आहे. मात्र सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडचं विदारक चित्र समोर आलं आहे. आजपर्यंत बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकारांनी आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. त्यामागील कारण होतं नैराश्य. बॉलिवूडमधील यश जसं तिथं काम करणाऱ्या कलाकारांना ओळख आणि आनंद देतं, तसंच तिथलं अपयश या कलाकारांना नैराश्याच्या गर्देत लोटलं. याच नैराश्यामुळे याआधी अनेक कलाकारांना स्वत:ला संपवलं आहे. सुशांतही त्याच नैराश्याचा बळी ठरला. सुशांत सिंह राजपूतला सर्वात आधी ओळख मिळवून दिली आणि घराघरात पोहोचलं ते झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेने. या मालिकेचं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशा गारूड निर्माण झालं होतं. याच मालिकेत सुशांतसोबत प्रमुख भूमिकेत होती ती अभिनेत्री अंकिता लोखंडे. पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते. छोट्या पडद्यावर हिट ठरलेल्या या जोडीच्या अफेरची मोठी चर्चाही झाली. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिची एका बिझमनसोबत एंगेजमेन्ट झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या सेलेब्रिटींनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला आहे. सुरुवातीला इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी दुर्धर आजाराशी झुंज देत शेवटी हार पत्करली. त्यानंतर साजिद- वाजिद या संगीतकार जोडीतले वाजिद खान यांचं कोरोनाव्हायरसमुळे निधन झालं. संपादन - अक्षय शितोळे