मुंबई, 14 जून : मोठ्या पडद्यावर महेंद्रसिंग धोणीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत सिंह राजपूतने अचानक एक्झिट घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सुशांतने आज दुपारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याच्या घरी त्याचे मित्रही आले होते. मित्रांसोबत दिवस घालवण्यानंतर दुपारी तो आपल्या खोलीत गेला, तो परत आलाच नाही. घरातील नोकराला सुशांतने गळफास घेतल्याचं आढळून आलं. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त झाला होता. त्याच्यावर स्पेशल डॉक्टरांकडे उपचार सुरू होता. घरातून त्याच्या वैद्यकीय उपचाराची कागद पत्र आढळून आली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, सुशांतच्या घरात त्याचे मित्र आलेले होते. त्याच वेळी त्याने आत्महत्या केली. गेल्या काही दिवसात बॉलिवूडला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक मोठ्या सेलेब्रिटींनी अनपेक्षितपणे जगाचा निरोप घेतला आहे. सुरुवातीला इरफान खान आणि ऋषी कपूर यांनी दुर्धर आजाराशी झुंज देत शेवटी हार पत्करली. त्यानंतर साजिद- वाजिद या संगीतकार जोडीतले वाजिद खान यांचं कोरोनाव्हायरसमुळे निधन झालं. सुशांतच्या आत्महत्येमुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेकांनी हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अगदी एकच आठवड्यापूर्वी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिने तिच्या राहत्या इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या बातमीनंतर सुशांतने Tweet करून भावना व्यक्त केल्या होत्या. ‘दिशाची बातमी हादरवून टाकणारी आहे. तिच्या मित्रांना आणि कुटुंबाला माझ्याकडून भावपूर्ण सांत्वन’, असं त्यानं लिहिलं होतं. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.