मुंबई, 19 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी लवकरच दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. नुकतंच अभिनेत्रीने तिच्या सोशल अकाउंटवरुन चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, या चित्रपटाचं शीर्षक काय असणार, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सनीने आपल्या फिल्मी करिअरबाबत काही महत्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. अभिनेत्रीनं नुकतंच एका मुलाखतीत खुलासा केला की या 10 वर्षांत ती पूर्णपणे बदलली आहे. सोबतच बी टाऊनमधील आपला प्रवास प्रचंड कठीण होता कारण कोणताही दिग्दर्शक आपल्यासोबत काम करायला तयार नव्हता असं सनीने म्हटलं आहे.
नुकतंच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सनीनं तिच्या बॉलिवूडमधील प्रवासाविषयी सांगितलं. अभिनेत्रीनं म्हटलं, 'या 10 वर्षांत ती पूर्णपणे बदलली आहे. सनी म्हणाली, “मला ही इंडस्ट्री आवडते. मला इथं जे काही काम मिळालं त्यात मी आनंदी आहे. याठिकाणी अनेक चांगले-वाईट निर्णय घेतले गेले, पण त्या वाईट निर्णयातूनही खूप काही शिकायला मिळालं. हे माझं घर आहे आणि मी येथील प्रत्येक क्षणाचा आनंद घेते.”सोबतच सनीनं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
बॉलीवूडमधील तिच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करुन देताना सनीनं सांगितलं की, आपल्या भूतकाळामुळे आपला बॉलिवूडमधील प्रवास दिसतो तितका सोपा नव्हता. अनेक चित्रपट निर्माते तिच्यासोबत काम करण्यास इच्छुक नव्हते. ती म्हणते, “जेव्हा मी इथे आले तेव्हा अनेकांना माझ्यासोबत काम करायला आवडलं नाही. आजही अनेक प्रॉडक्शन हाऊस मला काम देऊ इच्छित नसतील, पण मला त्यात काहीच अडचण नाही. कदाचित भविष्यात मलाही त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल.”असं म्हणत अभिनेत्रीनं खंत व्यक्त केली आहे.
(हे वाचा:Zwigato: कपिल शर्माचा आगामी सिनेमा थेट पोहोचला आंतरराष्ट्रीय महोत्सवात; VIDEO करतोय इम्प्रेस )
सनी लिओनीच्या बॉलिवूड करिअरबाबत सांगायचं तर, तिने 2012 मध्ये 'जिस्म-2' चित्रपटातून डेब्यू केला होता. पूजा भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात सनीसोबत बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा दिसला होता. यानंतर 'सनी जॅकपॉट', 'रागिनी एमएमएस 2' , 'एक पहली लीला', 'कुछ कुछ लोचा है', 'मस्तीजादे' , 'वन नाइट' स्टँड' अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सनी लियोनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस'मध्ये पहिल्यांदा झळकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.