मुंबई, 26 ऑगस्ट- सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेता आहे. त्यानं चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सुबोध सतत नवनवीन प्रयोग करत असतो. त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सुबोध लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता लवकरच आपल्या पहिल्यावहिल्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे पोस्ट- सुबोध भावेनं पोस्टर शेअर करत लिहलंय, ‘आपल्या मराठी भाषेत एक उत्तम वेब सिरीज करावी आणि त्यात आपण काम करावं अशी खूप मनापासून ईच्छा होती. रहस्य कथा हा माझ्या आवडीचा विषय.2020 लॉकडाऊन च्या काळात सलील देसाई यांची एक रहस्य कादंबरी वाचनात आली.ती वाचून ठरवलं की ही आपल्याला करता आली पाहिजे.आज कादंबरी वाचून 2 वर्षानंतर त्यावर आधारित मराठीमधील पहिल्या भव्य अशा वेबसीरिज ची घोषणा करताना मनस्वी आनंद होतोय.आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या वेब सीरिजच पाहिलं पोस्टर प्रकाशित करतोय. आज पोस्टर आणि उद्या त्याचा पहिला टीझर तुमच्या समोर येईल. नवीन वर्षात जाने 2023 मध्ये ही वेब मालिका तुम्हाला पाहायला मिळेल.हे स्वप्न पूर्ण करण्यात अनेकांचा हातभार आहे,निखिल साने, मंजिरी भावे आणि ज्योती देशपांडे (जिओ स्टुडिओ)तसेच माझ्या पडद्यावरील आणि पडद्यामागे काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार.. एक चित्तथरारक माईंड गेम !!!एक विकृत सिरियल किलर.. आणि एक कर्तबगार पोलिस अधिकारी…जिओ स्टुडिओज् घेऊन येत आहे मराठीतला पहिलाच थरारक आणि रोमांचकारी Action Thriller वेब शो.. ‘.या वेबसीरिजचं नाव ‘कालसूत्र’ असं असणार आहे.
**(हे वाचा:** स्त्रीची सर्वात जवळची मैत्रिण कोण?; पाहा काय म्हणाली Mrunmayee Deshpande ) सुबोध भावेनं या वेबसीरिजची घोषणा करताच चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. आपल्या आवडत्या कलाकाराला आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर बघण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. सुबोधच्या पोस्टरमध्ये एका बाजूला पोलिसच्या वर्दीत सुबोध आणि दुसऱ्या बाजूला कैद्याच्या रुपात ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे दिसून येत आहेत. ही जोडी डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोणता धुमाकूळ घालणार पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.