मुंबई,17 डिसेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंहच्या (Ranvir Singh) ‘83’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा बुधवारी (15 डिसेंबर) जेद्दाह येथे आयोजित रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला. जिथे या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका ट्विटर वापरकर्त्याने स्टँडिंग ओव्हेशन (Standing Ovation) घेत असलेल्या चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रणवीर सिंह, दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्टारर चित्रपट ‘83’ चे दिग्दर्शक कबीर खान यांनी आपली पत्नी मिनी माथूरसोबत या जेद्दा फेस्टिव्हलमध्ये ग्रँड अपियरन्स दिलं होतं.
ज्येष्ठ माजी क्रिकेटर कपिल देव यांनी आपली पत्नी रोमीसोबत या फेस्टिव्हलमध्ये उपस्थिती लावली होती. याठिकाणी दर्शकांसाठी ‘८३’ चं स्क्रीनिंगसुद्धा करण्यात आलं. रिलायन्स एन्टरटेनमेन्ट आणि पीव्हीआर प्रस्तुत हा चित्रपट येत्या २४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांना गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
Standing ovation and applauds at the end of the movie premier of 83 staring @RanveerOfficial and @deepikapadukone at the Red Sea Film Festival. Kudos to @kabirkhankk and team for the brilliant work. And the man himself Kapil Dev for his performance in 1983 pic.twitter.com/4a4uOSnJE6
— Helmifaisal (@mhelmifaisal) December 15, 2021
या चित्रपटाची निर्मिती दीपिका पादुकोण, कबीर खान,साजिद नाडियादवाला, विष्णू वर्धन इंदुरी, फँटम फिल्म्स आणि रिलायन्स एन्टरटेनमेन्ट ग्रुपने मिळून केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय जोडींपैकी एक असलेली रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. रामलीला, बाजीराव मस्तानी,पद्मावत अशा आयकॉनिक चित्रपटातून ही जोडी आपल्या भेटीला आली होती. चाहत्यांकडून त्यांना प्रचंड प्रेम मिळालं होतं. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. (हे वाचा: 15 व्या वर्षीच कतरिनाच्या प्रेमात पडला होता विकी! पाहा थ्रोबॅक फोटो? ) हा चित्रपट रणवीर आणि दीपिकासाठी फारच खास आहे. कारण या चित्रपटात रणवीर सिंह भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्याने या चित्रपटासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. मैदानात सराव करतानाचे त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारत आहे. दीपिकाचा फर्स्ट लूक समोर आल्यापासूनच चाहते या चित्रपटात दीपिकाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आणि महत्वाचं म्हणजे दीपिका आणि रणवीर लग्नानंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या मोठ्या मेजवानी सारखा असणार आहे.