मुंबई 04 ऑगस्ट: साऊथ इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री प्रणिता सुभाष सध्या बरीच चर्चेत येत आहे. ही तेलगु अभिनेत्री सध्या ट्रोलर्सचा सामना करताना दिसत आहे. प्रणिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे सध्या तिच्यावर बरीच टीका होताना दिसत आहे. प्रणिताने (pranita subhash trolling) नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला ज्यामध्ये ती तिचा पती नितीन राजूच्या पायाजवळ बसलेली दिसत आहे. फोटोमध्ये तिच्या हातात पूजेचं ताट असून नवऱ्याची पूजा करताना दिसत आहे. तसंच नवऱ्याच्या पायाशी पूजेचं साहित्य सुद्धा दिसत आहे. हा फोटो शेअर केल्यावर नेटकरी बरेच नाराज झाले होते आणि त्यामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता. मात्र यावर आता प्रणिताने स्वतःच मत व्यक्त केलं असल्याचं समोर आलं आहे. प्रणिता भीमना अमावस्येच्या निमित्ताने नवऱ्याची पूजा करताना दिसून आली होती. यादिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवते असं सांगितलं जातं. ट्रोल केल्यानंतर एका मुलाखतीत प्रणिता यावर उत्तर देत म्हणाली, “आयुष्यात असे अनेक पैलू असतात जे आपल्याला दिसत नाहीत. आणि माझ्यामते अधिकतर लोकांनी या फोटोवर भरभरून प्रेमच दिलं आहे. बाकीच्यांकडे मी फारसं लक्ष देत नाही. हे ही वाचा- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता मालिकेमधून आता आणखी एका महत्त्वाच्या पात्राची एक्झिट; चर्चांना उधाण मी एक अभिनेत्री आहे मी एक प्रसिद्ध चेहरा आहे याचा अर्थ मी माझे धार्मिक संस्कार विसरेन असा होत नाही. आणि विशेषतः असे रीतिरिवाज जे बघून मी मोठी झाले आणि ज्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी मागच्या वर्षी नवीन लग्न झाल्यावर सुद्धा ही पूजा केली होती.”
तसंच तिने पुढे सांगितलं की तिच्यासाठी ही नवी गोष्ट नाही. ती आधीपासूनच असे रीती रिवाज बघत आली आहे आणि त्यांचं पालन सुद्धा करत आली आहे. “मी नेहमीच घरगुती विचारांची होते. मला घरासाठी, कुटुंबासाठी बऱ्याच गोष्टी करायला आवडतात. सनातन धर्मावर माझा विश्वास आहे. माणूस विचारांनी कितीही मॉडर्न झाला तरी परंपरांना स्वतःच्या मुळांना विसरून चालणार नाही.” प्रणिताने 2021 मध्ये नितीन राजू या व्यावसायिकाशी विवाह केला. तसंच ती याच वर्षी आई सुद्धा झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून तिचं नाव आरना असं आहे.