मुंबई, 16 डिसेंबर : सध्या सगळीकडे ‘अवतार’ या सिनेमाची चर्चा आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. पण त्यामुळे मराठी सिनेमासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. मराठी मनोरंजनविश्वात काही दिवसांपासून ‘व्हिक्टोरिया’ सिनेमाची चर्चा सुरु होती. सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णीचा हा बहुचर्चित सिनेमा खरंतर आज म्हणजेच 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाचं प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सोनाली कुलकर्णीने पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोगचा बहुचर्चित हॉररपट ‘व्हिक्टोरिया’ आज 16 डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. पण इतक्यात बातमी समोर येतेय की सिनेमाचं प्रदर्शन तब्बल महिनाभर पुढे ढकलण्यात आलं आहे. हा सिनेमा आता 13 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असं समोर आलं आहे. आणि याचं कारण आहे बहुचर्चित,बिग बजेट सिनेमा ‘अवतार’. हॉलीवूडच्या ‘अवतार’ मुळे मराठी व्हिक्टोरियाला स्क्रीन मिळाल्या नाहीत. त्यामुळे चांगल्या सिनेमाचं नुकसान होऊ नये, लोक एक उत्तम कलाकृती पाहण्याला मुकू नयेत म्हणून व्हिक्टोरियाच्या निर्मात्यांनी नमतं घेत व्हिक्टोरियाचं प्रदर्शन पुढे ढकलल्याचं कळत आहे. हेही वाचा - Avdhoot Gupte: ‘हे सर्व पुरस्कार शेवटी…’; त्या नामांकनानंतर अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत सोनालीने पोस्ट करत याविषयी म्हटलंय कि, ‘‘हिक्टोरिया हा मोठ्या स्क्रीनच्या अनुभवासाठी बनलेला चित्रपट आहे . बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त शोज सह आणि इतर कोणत्याही संघर्षां शिवाय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आमचे ध्येय आहे आणि याच दृष्टिकोनातून आम्ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत. व्हिक्टोरियाचे रहस्य आता 13 जानेवारी 2023 ला उलगडणार… रसिक प्रेक्षक हो असेच प्रेम असू द्या!’’
अनेकदा मराठी चित्रपटावर स्क्रीन न मिळण्याची अडचण येते त्यामुळे चित्रपटाचे मोठे नुकसान होते. अलीकडेच ‘दृश्यम २’ सोबत रिलीज झालेल्या ‘सनी’ चित्रपटालाही या गोष्टीचा सामना करावा लागला होता. आता ‘हिक्टोरिया’ वर देखील तीच वेळ येऊ नये म्हणून याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
‘व्हिक्टोरिया’ या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी ‘व्हिक्टोरिया’ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. हीरा सोहल या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या सिनेमाचे निर्माते आहेत. तर वैशल शाह हे सह निर्माता आहेत. या सिनेमाचं शूटिंग स्कॉटलंडमध्ये झालं आहे. झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेमधून पदार्पण केलेला प्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णीने या चित्रपटाद्वारे दिगदर्शनात पाऊल टाकले आहे. आता प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.