मुंबई, 19 जुलै : सलीम आणि अनारकली यांची प्रेमकहाणी कोणाला माहिती नाही असं फार क्वचित होईल. सलीम अनारकलीची प्रेम कहाणी सांगणारा मुघल ए आझम हा सिनेमा सर्वांना माहिती आहे. सिनेमा त्याकाळचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. काळ बदलला तसं मुघल ए आझम वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येऊ लागला. असाच एक नवा प्रयोग सुरू आहे तो म्हणजे ‘मुघल-ए-आझम, द म्युझिकल’च्या माध्यमातून. ज्यातून अनेक मराठी कलाकार, गायक आणि नृत्यांगनाना मोठी संधी मिळाली आहे. ‘मुघल-ए-आझम, द म्युझिकल’ या भव्यदिव्य संगीतनाटकातून प्रसिद्ध मराठी गायिका प्रियांका बर्वे ही संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली आहे. या संगीत नाटकात प्रियांकानं अनारकलीची प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रियांकाच्या सुरेल आजावात जब प्यार किया तो डरना क्या हे गाणं ऐकण्याचं सुख लाखो प्रेक्षकांना मिळालं आहे. या संगीत नाटकाचा सध्या अमेरिका दौरा सुरू आहे. या दौऱ्यावरून प्रियांका नुकतीच मुंबईत परतली आहे. परत आल्यानंतर तिथला अनुभव सांगताना भावुक झाली. प्रियांका बर्वे उत्तम गायिका आहे हे सर्वांना माहिती आहे. ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकात देखील काम केलं होतं. पण ‘मुघल-ए-आझम, द म्युझिकल’ मधील प्रियांकाचं गाणं आणि अभिनय प्रेक्षकांना घायाळ करतो. जवळपास 300 हून अधिक कलाकारांचा क्रू अमेरिकेला गेला होता. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध लिंकन सेंटरमधील डेव्हिड एच कोच नाट्यगृहासह अनेक महत्वाच्या नाट्यगृहांमध्ये ‘मुघल-ए-आझम, द म्युझिकल’चे शो झाले. हेही वाचा - Ravindra Mahajani Daughter : रवींद्र महाजनींच्या लेकीला कधी पाहिलंय का? गश्मीरने बहिणीविषयी केला होता मोठा उलगडा
‘मुघल-ए-आझमचे अमेरिकेतील प्रयोग करून गायिका प्रियांका बर्वे भारतात परतली आहे. भारतात येताच तिनं व्हिडीओ करत कार्यक्रमाची खास झलक शेअर केली आहे. बॅकग्राऊंडला जब प्यार किया तो डरना क्या हे प्रियांकाच्या आवाजातील गाणं वाजत असलेल्या व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्रियांकानं पोस्ट लिहित कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिनं लिहिलंय, अमेरिकेत मुघल-ए-आझमसाठी परफॉर्म करण हा माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता. प्रशस्थ आणि भव्य ठिकाणं, सर्वोत्कृष्ट कलाकार आणि संपूर्ण क्रू टीमचं अप्रतिम आदरातिथ्य. प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद आणि आशिर्वाद यामुळे हे दिवस काय लक्षात राहतील. या साऱ्यासाठी माझ्याकडे फक्त कृतज्ञता आहे. स्वप्न सत्यात उतरलं आहे.
गायिका प्रियांका बर्वे काही दिवसांसाठी भारतात आली आहे. पण नाटकाची बऱ्यापैकी टीम अजूनही अमेरिकेत आहे. लवकरच व्हँकुव्हर आणि सॅन जोस येथे ‘मुघल-ए-आझम, द म्युझिकल’चे प्रयोग पार पडणार आहेत. ‘मुघल-ए-आझम, द म्युझिकल’ या संगीतनाटकाचं दिग्दर्शन फिरोझ अब्बास यांनी केलं आहे. अनारकलीची प्रमुख भुमिका प्रियांका बर्वेनं साकारली आहे. गायन, नृत्य आणि अभिनय अशा तिन्हा गोष्टी करण्याची संधी तिला यात मिळाली. तर प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनिष मल्होत्रानं नाटकाचं कॉच्युम डिझाइन केले आहेत.