मुंबई, 24 ऑगस्ट : झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. या मालिकेतील नेहा आणि यशाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांच्यासोबतच मालिकेतील परी अर्थात मायरा वैकुंठ हीसुद्धा प्रचंड हिट आहे. या सगळ्यांमुळे मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. आता या मालिकेने एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. नुकताच मालिकेला सुरु होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्त सगळ्या चाहत्यांनी मालिकेच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा यशवर्धन चौधरी म्हणजेच श्रेयस तळपदेने त्याच्या मालिकेला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. तो या पोस्टमध्ये भावूक झालेला दिसत आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलेला अभिनेता श्रेयस तळपदेने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेद्वारे खूप वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. त्याची या मालिकेतील भूमिका तशीच लोकप्रिय सुद्धा झाली. त्याने साकारलेला यश पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहचला. आता मालिकेला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर करत मालिकेतील सहकलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचे आभार मानले आहेत. हेही वाचा - Taarak Mehta Ka Ooltah Chashma : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार; नवीन तारक मेहता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार त्याने या पोस्टमध्ये मालिकेतील बीटीएस चा एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने लिहिलं आहे कि, आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. या मालिकेमुळे माझं आयुष्य बदललं. मला खूप नवीन मित्र आणि जन्मभरासाठी नवीन आठवणी मिळाल्या. मी माझ्या भावना कश्या व्यक्त करू मला समजत नाहीये.’
पुढे त्याने मालिकेतील सहकलाकारांचे आभार मानले आहेत. प्रार्थना तुझ्यामध्ये मला माझी एक खूप चांगली मैत्रीण मिळाली. तू नेहा आहेस म्हणून यश चांगला शोभतो.’ अशा भावना त्याने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे विषयी व्यक्त केल्या आहेत. त्याने पुढे सगळ्यांच्या लाडक्या परीलाही थॅंक्यु म्हटलं आहे. तसेच या मालिकेतील त्याचा लाडका मित्र समीर अर्थात संकर्षण कऱ्हाडे विषयी देखील श्रेयसने ‘मला तुझ्या रूपाने एक चांगला मित्र आणि लहान भाऊ मिळाला’ अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. श्रेयसने लिहिलेल्या या भल्यामोठ्या पोस्टवर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.