मुंबई, 16 जुलै : अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (Dr.Amol kolhe) त्यांच्या दमदार अभिनयामुळे ओळखले जातात. विशेष करून त्यांच्या ऐतिहासिक, शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते जनसामान्यात प्रसिद्ध झाले. त्यांनी टीव्हीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहचवला. आता ते तोच इतिहास मोठ्या पडद्यावर आणायला सज्ज झालेत. त्यांच्या ‘गरुडझेप’ (Garudjhep) या चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण झालं आहे. विशेष म्हणजे हे शूटिंग थेट आग्र्याच्या लाल किल्यात पार पडलं. इथे पहिल्यांदाच एखाद्या मराठी सिनेमाचं शूटिंग झालं आहे. याविषयी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत डॉ. अमोल कोल्हेनी माहिती दिली आहे. डॉ. अमोल कोल्हे शिवाजी महाराज्यांच्या पराक्रमाची गाथा चित्रपटाद्वारे घेऊन येणार आहेत. ‘शिवप्रताप’ या चित्रपटाच्या मालिकेअंतर्गत ‘गरुडझेप’, वचपा’ आणि ‘वाघनख’ या तीन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. त्यातील पहिला चित्रपट गरुडझेप या चित्रपटाचं शूटिंग आग्र्याच्या लाल किल्यात झालं जिथे प्रत्यक्ष इतिहास घडला होता.
याविषयी अमोल कोल्हेनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लाल किल्ल्यातील शूटिंगचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी लिहिलं आहे कि, अनेकांनी आग्र्याच्या लाल किल्यात शूटिंग करणं म्हणजे वेडेपणा आहे, तिथे शूटिंग कस शक्य होईल अशा शंका कुशंका व्यक्त केल्या होत्या. पण प्रत्यक्ष इतिहास जणू 356 वर्षानंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहणार होता. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात 38 ते 40 डिग्री असलं तरी आद्रतेमुळे 42-44 वाटणार तापमान ते हि सकाळी 9 वाजता, चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून बेस कॅम्प पर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना… सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा..रोज 4-5 जण अंथरूण धरायचे नाहीतर थेट हॉस्पिटल मध्ये.. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ’ बचेंगे तो और भी लडेंगे’ या ईर्षेने शूटिंग सुरु.’’ अशा शब्दामध्ये अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेहि वाचा - Amruta deshmukh and Hruta durgule : पुण्याची टॉकरवडी आहे हृताची बहीण? देशमुख सिस्टर्सचा VIDEO तुम्ही पाहिलात का? अभिनेते आणि खासदार असलेले अमोल कोल्हे यांनी चित्रपटाच्या शूटिंगची झलक दाखवली आहे. तसेच मध्यंतरी गरुडझेप चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गरुडझेप हा चित्रपट नक्कीच भव्यदिव्य असणार याबद्दल शंका नाही. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता आहे.