मुंबई, 25 सप्टेंबर : वाद-विवाद, मैत्री, प्रेम यांमुळे नेहमीच चर्चेत असणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. या शोमुळे अनेक कलाकार घराघरांत पोहचले आहेत. अशीच एक कलाकार जिला बिग बॉसमुळे नवी ओळख मिळाली असून तिनं प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शहनाज गिल आहे. ‘बिग बॅस 13’ मुळे शहनाज चांगलीच प्रसिद्धी झोतात आली आहे. तेव्हापासून तिची लोकप्रियता वाढतच चालल्याचं पहायला मिळतंय. नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या शहनाजने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने नवं गाणं गायल्याचं दिसत आहे. शहनाज गिलने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटातील गाणं गाताना दिसत आहे. तिनं गायलेल्या या रोमॅन्टिक गाण्याची चाहत्यांना चांगलीच भुरळ पडल्याची दिसत आहे. तिच्या या नव्या पोस्टवर भरभरुन कमेंटचा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
‘तुझा आवाज खूप चांगला आहे, तुला सिद्धार्थची आठवण येतेय ना, तू हे गाणं सुद्धार्थसाठी गायलंय ना?, सिदनाजची आठवण येतेय, मस्त, मॅजिकल आवाज आहे’, अशा अनेक प्रकारच्या कमेंट व्हिडीओवर येत आहेत.
गेल्या काही काळापासून ती नवनवीन गाण्याचे व्हिडीओ शेअर करत आहे. तिच्या गायनाला लोक पसंत करत आहेत. शहनाज लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. ती सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. याशिवाय ती जॉन अब्राहम, रितेश देशमुख आणि नोरा फतेहीसोबत साजिद खानच्या ‘100 टक्के’ चित्रपटात दिसणार आहे.यापूर्वी शहनाज दिलजीत दोसांझसोबत पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’मध्ये दिसली होती.