मुंबई, 1 जानेवारी : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर रोज काही नवे खुलासे होत आहेत. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलीस ‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’चा मुख्य अभिनेता शीझान खान ची सतत चौकशी करत आहेत. शनिवारी न्यायालयाने शीजानला दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस अजूनच किचकट होत चालल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता शीझान खानच्या वकिलांनी खळबळजनक दावा केला आहे. शीझान खानच्या वकिलांनी सांगितलं की, शीझान खानची सीक्रेट गर्लफ्रेंड आहे की बॉयफ्रेंड हे लवकरच सांगणार आहे. याशिवाय शीझान खानच्या वकिलांनी तुनिषाच्या मामावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, मीडियाच्या दबावाखाली त्यांनी शीझान मोहम्मद खानला अटक केलं असल्याचं त्याचे वकिल म्हणाले. त्यांनी पवन शर्मा हा तुनिषाचा खरा मामा नाही. तुनिषाच्या कुटुंबाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यांनी संपूर्ण तपासाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय त्यांनी एफआयआरमध्ये अनेक त्रुटीही नोंदवल्या आहेत.
शीझानचे वकिल म्हणाले, शीझानची मानसिक स्थिती काय आहे हे मी समजवू शकणार नाही. तीन दिवसांपूर्वी त्या तुरुंगात एकाने आत्महत्या केली होती, त्यामुळेच आम्ही समुपदेशनाची मागणी केली आहे. ते म्हणाले की, शीझानला एकटे सोडू नये. शीझान अशा स्थितीत आहे की तो आत्महत्येसारखे पाऊलही उचलू शकतो. त्यामुळे सध्या शीझानची मानसिक स्थिती चिंताजनक आहे.
दरम्यान, तुनिषा शर्माने 24 डिसेंबर रोजी अली बाबा दास्तान-ए-काबुल या टीव्ही शोच्या सेटवर गळफास लावून आपला जीव दिला होता. यानंतर 25 डिसेंबर रोजी पोलिसांनी शीजान खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली. तुनिषाची आई वनिता यांनी शीझान विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वनिताने शीझान खानवर तिची मुलगी तुनिषा शर्माची फसवणूक आणि ड्रग्ज घेतल्याचा आरोप केला आहे.