मुंबई 6 जून: शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे व्यक्तिमत्त्व मराठी चित्रपटसृष्टीतील एका अर्थाने अभिनयाचं दैवत आहे असं म्हणता येईल. त्यांची अभिनयक्षमता तर सर्वाना ठाऊक आहेच पण त्यांचं थेट व आक्रमक बोलणं, डोळ्यातून दिसणारा तडफदार अभिनय याचे सगळेच फॅन्स आहेत. नथुराम गोडसे नाटकाच्यावेळी तर त्यांना अनेक प्रसंगांना सामोर जावं लागलं. त्यातीलच एक थरकाप उडवणारा प्रसंग त्यांनी एका मुलाखतीत शेअर केला होता. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Mi Nathuram Godse Boltoy) हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकाला जितका प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाटकाला कडाडून विरोध सुद्धा झाला. अनेक मोर्चे, निदर्शनं यातून वाट काढत खुद्द प्रेक्षकांना सुद्धा नाटकाला दबकत यावं लागत होतं. मात्र प्रेक्षकांनी या नाटकाला कायम हाऊसफुल प्रतिसाद दिला. त्यामुळे या नाटकाच्या कित्येक प्रयोगांना कायम हाऊसफुलचाच बोर्ड लागला. हे नाटक गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचा जीवनप्रवास सांगणारं होतं. या नाटकाचा विषय खूप वादातीत असल्याने तत्कालीन राजकीय पक्षांनी आणि अनेकांनी या नाटकाला विरोध केला आणि ठिकठिकाणी प्रयोग बंद पाडायची सत्र सुद्धा चालू झाली. अशा परिस्थितीत सुद्धा न डगमगता सगळी टीम जोमाने प्रयोग करत होती. या नाटकाच्या आठवणींबद्दल (Khupte tithe Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ या झी मराठीवरील मुलाखतीच्या कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी एक आठवण शेअर केली होती. ते असं सांगतात,” हा किस्सा चंद्रपूर इथे घडला आहे. रात्री 9.30 चा प्रयोग होता आणि खूप लांबून लोक प्रयोगाला आले होते. या भागात नाटकांचे जास्त प्रयोग होत नसल्याने अनेकजण बायकामुलांसह सहकुटुंब आले होते. साधारण अडीच तासात संपणारं नाटक त्यादिवशी पहाटे ६. वाजता संपलं. कारण नाटक सुरु झाल्यावर मधेच 150 च्या आसपास लोक ऐन प्रयोगात घुसली आणि खूप मोठा राडा सुरु झाला. जो राडा रात्री सुरु झाला तो पहाटेपर्यंत चालू होता. आणि अचानक घुसलेल्या लोकांनी तोडफोड सुरु केली. पण एकही प्रेक्षक प्रेक्षागृहातून बाहेर पडला नाही. अखंड वेळ आम्ही प्रेक्षकांच्या पाठिंब्याने त्या दंगेखोरांशी लढत होतो. अखेर पहाटे साडे चारला वातावरण निवलं आणि सुरळीत प्रयोग सुरु झाला. नाटकाबद्दल इतके वाद सुरु असतानाही प्रेक्षकांनी कधीच नाटकाकडे पाठ फिरवली नाही यात त्यांचं प्रचंड कौतुक आहे.” नाटकाला विरोध करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल या नाटकांनासुद्धा कडाडून विरोध झाला होता. ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शनं, कलाकारांना धमक्या अशा अनेक गोष्टींना कलाकारांना सामोरं जावं लागत असे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.