मुंबई,1 एप्रिल- बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जी एकमेकांची सावत्र भावंडे आहेत. यामध्ये अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर, सारा अली खान-तैमूर अली खान, सनी देओल आणि ईशा देओल अशा अनेक लोकप्रिय सेलिब्रेटींचा आणि स्टारकिड्सचा समावेश होतो. तसेच यामध्ये आणखी एक नाव आवर्जून येतं आणि ते म्हणजे अभिनेता शाहिद कपूर आणि ईशान खट्टर यांचं. ही दोघे सावत्र भावंडे आहेत. मात्र या दोघांमधील प्रेम सख्ख्या भावंडांनाही लाजवेल असं आहे.
शाहिद कपूर आणि ईशान खट्टर ही सावत्र भावंडे असूनही दोघांमध्ये फारच छान नातं आहे. दोघेही एकमेकांची प्रचंड काळजी घेताना आणि आदर करताना दिसून येतात. दोघेही एकमेकांच्या खास क्षणी आणि संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. या दोघांचं प्रेम पाहून सर्वांनाच हेवा वाटतो. नुकतंच एका मुलाखतीत ईशान खट्टरने भाऊ शाहिद कपूरबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना ईशान खट्टर म्हणाला शाहिद भाऊ माझ्यासाठी किती खास आहे हे शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण तो मला माझ्या वडिलांच्या जागी वाटतो. त्याच्याजवळ तीच माया, तेच प्रेम आणि तिची काळजी मला जाणवते. मी लहान असल्यापासून त्याने माझी अशीच काळजी घेतली आहे. त्याने कधीही मला एकटं पडू दिलं नाहीय. तो १५ वर्षांचा असताना माझा जन्म झाला होता. तेव्हापासून तो मला त्याच्या मुलाप्रमाणे जपतो. इतकंच नव्हे तर त्याने माझे डायपरसुद्धा बदलले आहेत. त्यामुळे तो माझ्यासाठी वडिलांच्या जागी आहे.
ईशान खट्टरने या मुलाखतीत आपण शाहिदला एका टोपणनावाने बोलावत असल्याचंही सांगितलं, ईशान म्हणाला मी त्याला बाबा साशा या नावाने बोलावतो. कारण तो खरंच मला माझ्या बाबांसारखा आहे. ईशान भाऊ शाहिदच नव्हे तर वहिनी मीराच्यासुद्धा फारच जवळ आहे. या दोघांमध्ये छान बॉन्डिंग आहे. तिघेही सतत मजामस्ती करताना दिसून येतात. या तिघांच्या सोशल मीडियावर अनेक पोस्ट दिसून येतात. शाहिद आपल्या भावासोबत व्हेकेशनवरसुद्धा जाताना अनेकवेळा दिसून आला आहे.
शाहिद कपूर आणि ईशान खट्टर यांची आई आणि अभिनेत्री नीलिमा अजीम यांनी तीन लग्ने केली आहेत. पहिल्यांदा त्यांनी अभिनेते पंकज कपूर यांच्यासोबत लग्न केलं. त्यांनतर त्यांनी राजेश खट्टर यांच्यासोबत लग्न केलं होतं. परंतु या दोन्ही लग्नामध्ये त्यांची घटस्फोट झाली. त्यांनतर त्यांनी तिसऱ्यांदा रजा अली खान यांच्यासोबत लग्न केलं होतं. परंतु तिसऱ्यांदाही त्यांनी घटस्फोट घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Shahid kapoor