मुंबई, 21 जुलै: ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘झेंडा’, ‘मोरया’ सारख्या सिनेमा आणि मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोष सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या पोस्ट नेहमीच सर्वांच लक्ष वेधून घेत असतात. संतोषच्या प्रत्येक पोस्टवर त्याचे चाहते प्रतिक्रिया देत असतात. मात्र यावेळी संतोषनं शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याचे चाहते चांगलेच भावूक झाले आहेत. संतोष जुवेकर टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांचा ओळखीचा आणि आपला वाटणारा चेहरा आहे. ‘वादळवाट’ मालिकेपासून संतोष आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. नुकताच त्यानं वादळवाट मालिकेतील एक गोड आठवण चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ती पोस्ट पाहून चाहते भारावून गेलेत. टेलिव्हिजनचा जुना काळ प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. वादळवाट मालिकेच्या वेळी संतोष फारच तरुण होता. चाहत्यांमध्ये त्याची वेगळीच क्रेझ होती. मालिकेतील अभिनेत्री मिताली जगताप आणि त्याचा एक रोमँटिक सीन त्यानं शेअर केला आहे. ज्यात मिताली आणि संतोष यांच्यातील प्रेम पाहायला मिळत आहे. ‘एक खूपच गोड आठवण तुमच्या सोबत शेअर करतोय. खरं तर ती आपल्या सगळ्यांचीच गोड आठवण आहे. आवडली तर नक्की सांगा कशी वाटली’, असं म्हणत संतोषनं मालिकेचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या शेवटी मालिकेचं अजरामर गाणं देखील पाहायला मिळत आहे. हेही वाचा - TOP 10 Marathi Serials: यशच्या ट्विस्टनंतर ‘आई कुठे…‘चा TRP वाढला; अरुंधती दीपामध्ये पुन्हा स्पर्धा संतोषनं आठवण कशी वाटली हे सांगा असं म्हणताच त्याचे चाहते चांगलेच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. झी मराठीवरील म्हणजेच आधीच्या अल्फा मराठीवरील वादळवाट ही पहिली मालिका होती. अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे यांची दमदार स्टारकास्ट असलेल्या मालिकेत संतोष जुवेकरनेही महत्त्वाची भूमिका साकारली होती. देवकी पंडीत यांच्या आवाजातील मालिकेचं शिर्षक गीत तर अजरामर आहे. आज तरुणमंडळींना देखील हे गाणं आवडतं.
संतोषनं मालिकेची शेअर केलेली गोड आठवण पाहून चाहत्यानं आठवण शेअर करत म्हटलंय, ‘या आठवणीमुळे मी पण काही क्षण भूतकाळात गेले. जेव्हा माझी आई आणि ताई ही मालिका बघत असत आणि मला काही स्टोरी समजत नसेल तरी आईच्या मांडीवर डोकं ठेवून बघत असत. काही क्षण आठवणींना उजाळा दिला’.
तर आणखी एका चाहत्यानं म्हटलंय, ‘दादा आजही आम्ही या मालिकेचे आणि मालिकेतील कलाकारांना खूप मिस करतोय आणि टायटल तर आजही रिंगटोन म्हणून आहे’. तर काहींनी झी मराठीच्या जुन्या मालिका पुन्हा सुरू करा अशी विनंती केली आहे. एका चाहत्यानं म्हटलंय, ‘कळकळीची विनंती आहे की आत्ता ज्या सिरियल चालू आहेत त्या बंद करा आणि या जुन्या सिरियल्स परत चालू करा वादळवाट, आभाळमाया, अवघाची हा संसार, कळत नकळत, कुलवधू, श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकट फु, अनेक उत्कृष्ट मालिका झी मराठी वाहिनीनी दिल्या… त्यातील एक “वादळवाट "