शिखा धारिवाल/मुंबई, 25 ऑगस्ट : कॅन्सरग्रस्त अभिनेता संजय दत्तला (sanjay dutt) फुफ्फुसाचा कॅन्सर (lung cancer) असल्याचं निदान झाल्यानंतर तो उपचारासाठी अमेरिकेला जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. दरम्यान आता संजय दत्त अमेरिकेला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. संजय दत्तला अमेरिकेचा व्हिजाही मिळाला आहे.
संजय दत्त लवकरच उपचारासाठी अमेरिकेला जाणार आहे. त्याला 5 वर्षांचा यूएस व्हिजा मिळाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच तो न्यूयॉर्कसाठी रवाना होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर त्याच रुग्णालयात उपचार होणार आहेत. जिथं त्याची आई नर्गिस दत्त यांच्यावर उपचार झाले होते. नर्गिस यांनाही कॅन्सर होता.
संजय दत्तवर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याला लवकरच न्यूयॉर्कला नेलं जाणार असून त्याला व्हिजा मिळाला आहे, याबाबत दत्त कुटुंबाकडून अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही आहे.
हे वाचा - NEET, JEE साठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नका; सोनू सूदची केंद्राला विनंती
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 8 ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची कोरोना चाचणीसुद्धा झाली. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून दत्त कुटुंबीयांना दिलासा मिळाला असतानाच संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 11 ऑगस्टला संजय दत्तला तिसऱ्या टप्प्यातील फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं.
हे वाचा - सुशांतचा मृ्त्यू आर्थिक वादातून झाल्याचा संशय; ED पाठोपाठ CBI देखील करणार तपास
संजय दत्त आणि परिवारासाठी हा कठीण काळ आहे. याआधीही संजय आणि त्याच्या परिवाराने कठीण प्रसंगाशी सामना केला आहे. संजयने नेहमी या परिस्थितीशी धैर्याने सामना केला आहे. हा काळ देखील निघून जाईल, संजयला देवाने पुन्हा एकदा एका परीक्षेसाठी निवडले आहे आणि यामध्ये संजय जिंकेल, अशी भावना त्याची पत्नी मान्यताने संजयला कॅन्सरचं निदान होताच व्यक्त केली होती. तर कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी संजय दत्तने ट्विट करून माझ्यासाठी प्रार्थना करा, अशी भावुक पोस्ट केली होती.