Home /News /entertainment /

आमची कला म्हणजे 'तमाशा' आणि त्यांची 'नटश्रेष्ठ...', 'या' संघटनेकडून सुजयची जोरदार पाठराखण

आमची कला म्हणजे 'तमाशा' आणि त्यांची 'नटश्रेष्ठ...', 'या' संघटनेकडून सुजयची जोरदार पाठराखण

'मालिकेत दिसणारी आडनावे ही तीन टक्क्यावाल्यांना अनुसरून असतात. कोणीही खरं बोलत नाही.'

पुणे, 05 मार्च : 'मराठी मालिकांमध्ये सर्व ब्राह्मण मुलीच दिसतात, इतर मराठी मुली का नाही?' दिग्ददर्शक सुजय डहाके याने उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे मराठी सिनेसृष्टीत मोठा वादंग निर्माण झाला आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनी सुजय डहाकेवर सडकून टीका केली आहे. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने सुजयची पाठराखण केली आहे. पुण्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सुजय डहाकेचं कौतुक करत टीका करणाऱ्या सेलिब्रिटींना फटकारून काढलं आहे. 'सुजय डहाके जे बोलले ते अंतिम सत्य आहे. कारण 'चित्रपट सृष्टीत निर्माता-दिग्दर्शकांचे विचार 'कोरोना व्हायरस' पेक्षा भयानक आहेत.' अशी टीका शिंदे यांनी केली. तसंच, 'मालिकेत दिसणारी आडनावे ही तीन टक्क्यावाल्यांना अनुसरून असतात. कोणीही खरं बोलत नाही. काम देण्यापासून सगळं आडनावावरून ठरवतात आणि आमच्या मुलांची नावं स्पॉटबॉय आणि स्पेशल थँक्समध्ये दिसतात. आमची कला म्हणजे 'तमाशा' आणि साडेतीन टक्के वाल्यांची कला म्हणजे 'नटश्रेष्ठ...' इतका फरक व्यवस्थेमध्ये झालेला आहे.' असं परखड भाष्यही त्यांनी व्यक्त केलं. 'सुजय भाऊ... आम्ही तीस वर्षांपासून सांगतो की, आपल्या मराठा-बहुजनांची मुलं सगळ्या क्षेत्रात टॉपला गेली पाहिजेत. त्यांनी सगळी क्षेत्र काबीज केली पाहिजेत. आपल्या प्रतिष्ठित आणि पैसावाल्या लोकांनी आपल्याच मुलांना संधी दिल्या पाहिजेत, तरच बहुजन समाज सुधारेल, प्रत्येक क्षेत्रात दिसेल.' अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 'जोपर्यंत लिहिणारा, बोलणारा आणि सांगणारा बहुजनांचा असणार नाही, तोपर्यंत आपण इतिहास घडवणार नाही. इतिहास आपला असून काहीही उपयोग होणार नाही. कारण 'इतिहास घडवला मावळ्यांनी... परंतु, लिहीला मनुवादी कावळ्यांनी' म्हणून तो सोयीचा लिहिला आणि रंगवला गेला आणि तिथेच आपल्या व्यवस्थेचा घात झाला.' असा आरोपही शिंदे यांनी आपल्या पत्रात केला. सुजय डहाकेच्या वक्तव्यानंतर कलाक्षेत्रात खळबळ दरम्यान, मराठीमध्ये सुरू असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न सुजय डहाके यानं उपस्थित केला. 'मी स्वत: एका मीटिंगमध्ये होतो, तिथं म्हटलं गेलं की ती गायकवाड लागू बंधूच्या जाहिरातील काम कसं करणार? असं बोललं गेलं,' असा धक्कादायक दावा सुजय डहाके याने केला आहे. 'हा कोण येतो डहाके...याला कसा मिळतो राष्ट्रीय पुरस्कार...याचा अनेकांना राग आहे,' असा आरोपही त्याने केला आहे. सुजय डहाकेवर कलाकारांचा निशाणा मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत सुजयचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. 'मी ब्राह्मण नाहीये तरी माझ्याकडे काम आहे.', असं तेजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तेजश्री प्रधान हिनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं लिहिलं, ‘मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?’' ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’ शशांक केतकरही त्याच्या सोशल मीडिया पेजवर व्यक्त झाला आहे. त्यानं फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे ज्यात त्यानं सुजयवर सडकून टीका केली आहे. शशांकनं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, ‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, देवधर तुझा अभिनेता, जोशी तुझा संगीत दिग्दर्शक आणि तू कसले बिन बुडाचे आरोप करतोस रे. आपल्या क्षेत्रात फक्त टॅलेंटला जागा आहे. कृपा करून हे असले स्टंट करू नकोस. त्यापेक्षा तुझ्या कामावर लक्ष दे जमल्यास. साने आणि मंजुळे हे कॉम्बिनेशन पुरेस नाहीये का तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला? असो... कांबळे, छल्लारे आणि पवार यांच्या दिग्दर्शनाखाली हा केतकर रोज काम करतो आणि याचा मला अभिमान आहे. तू कोणत्या जाती धर्माचा आहेस याचा तसूभरही विचार डोक्यात न आणता तुझं कल्याणच होऊदे, तुझे चित्रपट चालू दे हीच इच्छा आहे.' '...तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील' तर दुसरीकडे, अभिनेता सौरभ गोखलेनंही जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं, स्वतःस अत्यंत प्रतिभावान आणि अभ्यासू समजणारे दिग्दर्शक मा. सुजय डहाके... आपण केलेली वक्तव्ये आणि विधाने यावर इतर कलाकारांनी आणि कलाक्षेत्रातील मान्यवरांनी स्पष्टीकरण द्यावे इतकी तुमची लायकी नाही. पुन्हा या प्रमाणे जातीयवाद आणि जातीपातीचे राजकारण या कलाक्षेत्रात घुसविण्याचा प्रमाद आपणाकडून घडल्यास आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील याची नोंद घ्यावी.’
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या