मुंबई, 28 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. बिग बॉस 16 येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या विकेंडपासून हा शो टीव्ही इंडस्ट्रीत पुन्हा धुमाकूळ माजवणार आहे. परंतु अद्याप या शोचे स्पर्धक समोर आलेले नाहीत. दरम्यान शो सुरु होण्यापूर्वी सलमान खानने बिग बॉसची पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सलमान खानने अनेक बाबींवर स्पष्ट भाष्य केलं. तसेच अभिनेत्याने आपल्या फीबाबतही खुलासा केला आहे. बॉलिवूड चित्रपट आणि कलाकारांची लक्झरी लाईफस्टाईल नेहमीच सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. तसेच बॉलिवूड चित्रपट बिग बजेटमुळे सतत चर्चेत राहतात. हे कलाकारसुद्धा अफाट मानधन घेऊन चर्चेत असतात. परंतु काही टीव्ही शो देखील आहेत, जे त्यांच्या बिग बजेटमुळे चर्चेत राहतात. यापैकीच एक शो म्हणजे ‘बिग बॉस’ होय. या शोचे मागील अनेक सीजन सलमान खानने होस्ट केले आहेत. हा शो म्हणजे सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच म्हणावी लागेल.यंदाही सलमान खान हा शो होस्ट करणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानने शो मेकर्सकडे त्याची फी 3 पट वाढवण्याची मागणी केल्याचा दावा केला होता. सलमान खानने सीजन 15 साठी 350 कोटी रुपये घेतल्याची चर्चा होती. त्यानुसार, हिशोब करायचा झाला तर सीजन 16 साठी सलमान खान 1000 कोटींहून अधिकची मागणी करत असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती. आता या गोष्टीवरून स्वतः सलमान खानने पडदा उठवला आहे. पाहूया अभिनेत्याने नेमकं काय म्हटलंय.
पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खानने शोच्या पहिल्या स्पर्धकाशी सर्वांना ओळख करुन दिली. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत फीबाबत विचारलेल्या प्रश्नावर मजेशीर अंदाजात सलमान खान म्हणाला- ‘इतकं मानधन मला आयुष्यात कधीच मिळणार नाही. एवढे पैसे मिळाले तर मी कधीच काम करणार नाही. माझा खर्च खूप आहे. जसं की वकील. अशा अफवांमुळे आयकर विभागाचे लोक मला नोटीस पाठवतात, मला भेटायला येतात. नंतर अभिनेता म्हणाला, माझी फी इतकी नाही. माझी फी या रकमेच्या 1/4 सुद्धा नाही. असं उत्तर देत सलमान खानने 1000 कोटी फी घेतल्याच्या फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे. (हे वाचा: Mouni Roy B’day: 15 व्या वर्षी अभिनेत्रीने सुरू केलं करिअर; आज आहे कोट्यावधींची मालकीण **)** यादरम्यान सलमान खानने सर्वांना या शोच्या पहिल्या स्पर्धकाची ओळख करून दिली. यंदाच्या सीजनचा पहिला स्पर्धक आहे कझाकिस्तानचा गायक अब्दु रोजिक. सलमान खानने अब्दू रोजिकच्या नावाची घोषणा करताच कझाकस्तानी गायकाने ‘दबंग’ मधील प्रसिद्ध डायलॉगसह एन्ट्री केली.त्यानंतर आता प्रेक्षकांना इतर स्पर्धकांची उत्सुकता लागून आहे.